मुंबई : मागील पन्नास वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी पवारांना लगावला होता. त्यांचा या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले आहे.
चाकणकर यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, चंद्रकांत पाटील हे शिवाजी विद्यापीठातून शरद पवारांवर पीएचडी करणार असून त्यांचा उत्तम मानस आहे. मात्र त्याआधी चंद्रकांत पाटील यांनी पदव्युत्तर व्हावे . त्यात पास झालेच तर पीएचडी पात्रतेचा विचार करावा. तसेच पवारांवर पीएचडी करणे तुमच्याकडून होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
भाजपही देशावरील आपत्ती आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केली होती. तर शरद पवार एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपलं म्हणणं कसं काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे’ असं चंद्रकांत पाटील तिरकसपणे म्हणाले होते.