राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 01:50 PM2019-07-27T13:50:25+5:302019-07-27T14:04:02+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पुण्याच्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली. काल (दि.२६) रोजी चित्रा वाघ यांनी या पदाचा आणि पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर तातडीने चाकणकर यांची निवड करण्यात आली.
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी पुण्याच्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली. काल (दि.२६) रोजी चित्रा वाघ यांनी या पदाचा आणि पक्षातील प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर तातडीने चाकणकर यांची निवड करण्यात आली.
चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याचर्चेला दुजोरा मिळत असून वाघ यांनी शुक्रवारी उशिरा आपला राजीनामा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला. त्यानंतर आज पुण्यात सुरु असलेल्या मुलाखतींच्या दरम्यान चाकणकर यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्याकड़े देण्यात आले. चाकणकर या पक्षात अनेक वर्ष कार्यरत असून त्यांनी पुण्याचे महिला शहराध्यक्षपद भूषवले आहे. नुकतीच त्यांच्या जागी स्वाती पोकळे यांची शहराध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे चाकणकर यांना प्रदेश कार्यकारिणीत घेतले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र थेट वाघ यांच्या जागी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान त्या खडकवासला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत.
या निवडीविषयी त्या म्हणाल्या की, 'माझ्यावर विश्वास ठेऊन पक्षाने दिलेल्या जबाबदारीचा आनंद निश्चित आहे. आमच्याकडे कायमच महिलांचा सन्मान राखला जातो. यापुढेही राज्यातील सर्व महिलांचे प्रश्न मार्गी लागतील असे काम करण्याचा प्रयत्न असेल. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांची आभारी असेन'.