पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर(NCP Rupali Chakankar) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. सध्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडण्याचा निर्णय घेतला. चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
रुपाली चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे. चाकणकर या पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. राज्यात २०१९ च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्यानं त्या जागी रुपाली चाकणकर यांना संधी मिळाली होती.
कोण आहेत रुपाली चाकणकर?
रुपाली चाकणकर या दौंडच्या असून त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला. पण त्यात फारसं यश मिळालं नाही. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या. रुपाली चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पण चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती. रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातून रूपाली चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला.
२००२ पासून पुढची ५-६ वर्षं रुपाली चाकणकर यांनी परिसरातील महिला बचतगटासाठी काम केलं. पुढे चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. तिथून रूपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. रुपाली चाकणकर यांचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांची पुणे शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्यानंतर २०१९ ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अचानक भाजपात प्रवेश करून धक्का दिला. तेव्हा रुपाली चाकणकर यांना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.