मुंबई – नुकत्याच झालेल्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेररचनेत महिला शहर अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे असलेले पद काढून घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे डिमोशन झाल्याची चर्चा पुण्यात सुरू होती. परंतु, आता त्याच चाकणकर यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी देऊन त्यांचे राष्ट्रवादीकडून प्रमोशन करण्यात आले आहे. तसेच राज्याची जबाबदारी दिल्यामुळे विधानसभा तिकीट मिळविण्यासाठीचा त्यांचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला आहे.
पुण्यात महिला राष्ट्रवादीचे काम चांगले असून याची पोचपावती अनेकदा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली होती. पुण्यात केलेली आंदोलने आणि महिलांच्या प्रश्नी सदैव सक्रिय राहिल्याचं फळ चाकणकर यांना मिळाले. २०१४ मध्ये त्यांची महिला राष्ट्रवादी पुणे शहरच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर आंदोलने केली. सत्ता नसताना देखील चाकणकर यांनी महिलांचे प्रश्न सतत लावून धरले. भाजप नेत्यांकडून महिलांविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध नोंदविण्यात चाकणकर सतत पुढे होत्या.
पुण्यातील धरणफुटीचे खापर जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्यांवर फोडले होते. त्यावर चाकणकर यांनी सावंत यांच्या घरात खेकडे सोडून निषेध केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आंदोलनामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या त्या एकमेव महिला नेत्या आहेत. परंतु, नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी शहर फेररचनेत चाकणकर यांच्याकडे असलेले शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागेवर स्वाती पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
दरम्यान लोकसभेला खडकवासला विधानसभा मतदार संघ बारामतीमध्ये येतो. परंतु, लोकसभा निवडणुकीत येथे भाजपला मोठी आघाडी मिळाली. खासदार सुप्रिया सुळे मोठ्या मतांनी या मतदार संघातून पिछाडीवर होत्या. त्यामुळे देखील चाकणकर यांचे पद काढण्यात आल्याचे बोलले जात होते. चाकणकर खुद्द खडकवासला मतदार संघातून इच्छूक आहेत. परंतु, ऐनवेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली. त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले. त्या पदावर आता रुपाली चाकणकर यांची वर्णी लागली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चाकणकर यांची खडकवासला मतदार संघातील उमेदवारीसाठी वर्णी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली.