अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:50 PM2024-09-05T12:50:26+5:302024-09-05T13:38:04+5:30
विधान परिषदेच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Rupali Patil Thombare : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. १४ सप्टेंबरपर्यंत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. मात्र या आमदारकीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? असं म्हणत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांची नेमणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत इतर महिलांना समान संधी द्यायला हवी असं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतरही महिला आहेत - रुपाली पाटील ठोंबरे
"एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा.अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार?
काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल," असे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, याआधीही रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. जून महिन्यात अजित पवार यांची भेट घेऊन रुपाली ठोंबरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. महिला आयोगाचं अध्यक्षपदी किंवा महिला प्रदेशाध्यक्ष पदी ठराविक काळाने सर्व महिलांना समान संधी मिळायला हवी, अशा भावना रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केली होती.