Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. मात्र, आता थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच आता भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना संपवण्याचे कारस्थान सुरू असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, अशी खुली ऑफर देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मात्र, मला कोणी संपवू शकत नाही. पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसे करु शकणार नाहीत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पंकजा मुंडेंना खुली ऑफर दिली आहे.
भाजपात पंकजा मुंडेंना संपवण्याचे कारस्थान सुरू
पंकजाताईंची भाजपने केलेली कोंडी, त्यांचे संपवलेले अस्तित्व हे जगजाहीर आहे. कोणी कोणी त्यांच्या मागे त्यांच्याच पक्षातल्या ज्यांना त्या आधी जवळचे म्हणत होत्या त्या लोकांनी कशा पद्धतीने काय केले ते आम्ही सांगायची गरज नाही. आम्ही व्यक्ती म्हणून आणि विचार योग्य म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत. प्रत्येक जण राजकीय जीवनात पक्ष म्हणून निमंत्रण देतच असतो. भाजपने सुद्धा शिंदे गट सत्तेसाठी आपल्यात घेतलाच आहे. त्यामुळे राजकारणामध्ये पक्ष म्हणून निमंत्रण देण्यात चूक नाही. त्या अनुषंगाने पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीने याआधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिलेले आहे. जी व्यक्ती लोकांच्या मनात आहे अशा व्यक्तीला पक्षात घ्यायला हरकत नसावी. पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत आल्या तर त्यांच स्वागतच आहे, अशी खुली ऑफर रुपाली पाटील यांनी दिली.
दरम्यान, भाजप वंशवादाचा विषय विरोधकांसाठी वापरतो. त्यांच्या पक्षांमध्ये सुद्धा वारसदारांनी आलेली अनेक नेते आहेत. आणि पंकजाताईंचे जे वक्तव्य त्याच्यावरून असे दिसत आहे की, जी लोक कामाने दमदार आहेत, जी लोकांच्या मनात आहेत, म्हणजेच मोदी साहेबांनी कितीही कितीही छल कपट किंवा कितीही यंत्रणा वापरल्या तरी लोकांच्या मनातून अशा व्यक्ती कमी होत नाहीत. त्यामुळे पंकजाताई म्हणाल्या असतील की, लोकांच्या मनातील स्थान हे माझं अस्तित्व आहे ते कोणीही संपू शकत नाही आणि ते बरोबरच आहे. जर काम करणारी व्यक्ती असेल जरी ती वारसा हक्काने आली असेल आणि तिच्या लोकांच्या मनात जर त्यांचं घर असेल तर त्यांना खुद्द मोदी सुद्धा संपवू शकत नाहीत, असे रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.