वसई/पारोळ : शाळा-कॉलेजना उन्हाळी सुट्टी पडली असल्यामुळे ग्रामिण भागातील क्रिकेटप्रेमी तरूणांनी नामी शक्कल काढली आहे. वसई-विरारमधील गावांमध्ये सद्या रात्रीचे प्रकाशझोतातील क्रिकेट सामने भरवले जात आहेत. आय पी एलचे २०-२० क्रिकेट सामने जसे प्रकाशझोतात खेळवले जातात तसेच दिवस-रात्र ओव्हर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धांचे आयोजन हौशी क्रिकेट प्रेमींकडून केले जात आहे. आणी या स्पर्धांना ग्रामिण भागातून मोठा प्रतिसादही पहावयास मिळत आहे.तालूक्यातील आगाशी, बोळींज, नानभाट, नाळा या गावांमध्ये आठवड्याच्या शेवटी शनिवार-रविवार या स्पर्धांचे आयोजन केले जाते. हे सामने प्रकाशझोतात खेळवले जातात म्हणून जनरेटरची व्यवस्थाही करण्यात येते. लाईव्ह कॉमेंट्री व डि जे लावून या आनंदात भर टाकण्यात येतो. पहाटे दोन-तीन वाजेपर्यंत हे सामने खेळवले जातात. या गल्ली बॉक्स क्रिकेट सामन्याचे नियमही तसेच मजेशीर असतात. अष्टपैलू खेळाडूलाही आपला खेळ या मैदानावर साभाळून खेळावा लागतो. लेग व आॅफ साईडला २ धावांचेच बंधन असते तर सिमारेषेवर षटकार मारल्यास खेळाडू बाद ठरवण्यात येतो. त्यामुळे खेळाडूला कितीही चांगला बॉल टोलवायला आला तरी सय्यम राखूनच खेळावं लागतं.चार ओव्हरच्या मॅच मध्ये चार गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागते. एका गोलंदाजाला दोन षटक टाकायची मुभा असते.गावपातळीवर खेळवल्या जाणाऱ्या या क्रकेट मॅचेससाठी काही वेळेला प्रायोजकही भक्कम शोधले जातात. हौसेला मोल नसते म्हणतात तसेच काही वेळा पदरमोड करून पैसेही जमा करून मोठ्या उत्साहात हे रात्रीचे सामने खेळवले जातात. आजूबाजूच्या गावातील ३५ ते ४० संघ यात सहभागी होतात. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रू.प्रवेश फी आकारली जाते. या सामन्यात बक्षीसेही तशीच मोठी दहा हजारांपर्यंत व चषक दिले जातात. त्याखालोखाल पाच हजार व चषक तर सामनाविर व मालीकावीर अशी रोख बक्षीसे वाटण्यात येतात. (वार्ताहर)
वसईच्या ग्रामीण भागात नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धांची क्रेझ
By admin | Published: April 27, 2016 4:26 AM