नारायण जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे नादुरुस्त रुग्णवाहिकांमुळे अनेकदा वाभाडे निघाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयांसाठी प्रत्येकीएक प्रमाणे नव्या ५०० रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचा सर्वात मोठा फायदा ठाणे जिल्ह्याला होणार आहे.
सध्या राज्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा केंद्राकडून मिळालेल्या रुग्णवाहिका वापरत आहे. मात्र, या रुग्णवाहिका जुन्या असून काही नादुरुस्त आहेत. तर ज्या काही चालू स्थितीत आहेत, त्यातील अनेक रुग्णवाहिका मध्येच रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडले आहेत.याशिवाय राज्यात खासगी संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांचा अनागोंदी कारभारही चव्हाट्यावर आला आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करतेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका बदलून नव्याने ५०० रुग्णवाहिका खरेदीसाठी ८७ कोटींच्या तरतुदीची घोषणा केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने या ५०० रुग्णवाहिकांच्या खरेदीसाठी ८९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये खर्च करण्यास गेल्या आठवड्यात मान्यता दिली आहे.अशी आहे खरेदीची मान्यताजिल्हा परिषदांच्या २५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४५ कोटी २८ लाख चार हजार २२० रुपये तर सार्वजनिक विभागाच्या मालकीच्या १३७ ग्रामीण रुग्णालयांसाठी २४ कोटी ५१ लाख ९४ हजार ३८० रुपये, १०६ जिल्हा/ उपजिल्हा रुग्णालयांसाठी १८ कोटी ८७ लाख १२ हजार ४४० रुपये आणि चार मनोरुग्णालयांसाठी ७१ लाख ५८ हजार ४९० रुपये असे एकूण ८९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपये खर्च करण्यास मान्यता दिली आहे.३८ रुग्णवाहिका मिळण्याची आशाठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एक जिल्हा रुग्णालय आणि उल्हासनगर, मुरबाड, शहापूर येथील उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालयासह ठाण्याचे मनोरुग्णालय अशा ३८ रुग्णवाहिका मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.