ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - ग्रामीण भागात राहण्याऱ्या भारतीयांकडून आरोग्यापेक्षा दारूवर तिप्पट खर्च होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडून आरोग्यावर दरमहा 56 रुपये खर्च केले जातात. तर दारूवर सरासरी 140 रुपये आणि तंबाखूवर 196 रुपये खर्च केले जातात.
टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एका सर्वेतून मिळालेली ही माहिती प्रकाशित केली आहे. क्रोम डीएम या संस्थेने हा सर्वे केला आहे. देशातील 19 राज्यातील 50 हजार खेड्यांना भेट देऊन हा सर्वे करण्यात आला आहेत. ग्रामीण कुटुंबांकडून दरमहा 500 रुपये विविध खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधनांवर खर्च केले जातात. तसेच मासिक खर्चामधून औषधांवर जास्तीत जास्त 196 रुपयांपर्यंतच खर्च होतात, असे या सर्वेत म्हटले आहे.
या सर्वेनुसार ग्रामीण भागातील कुटुंबाचा एकूण मासिक खर्च हा 2 हजार 800 रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी 504 रुपये प्रत्येक कुटुंबाकडून सौंदर्य प्रसाधनांसह इतर उत्पादनांच्या खरेदीवर खर्च होतात. ही रक्कम ग्रामीण कुटुंबांच्या मासिक खर्चाच्या 18 टक्के इतकी आहे. ग्रामीण कुटुंबाचे दरमहा 224 रुपये दुधावर तर 308 रुपये शेतीसाठी लागणाऱ्या इंधनावर खर्च होतात.