Russia-Ukraine Conflict: पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या हाती चक्क भारताचा तिरंगा ध्वज! रुमानिया विमानतळावर दूतावासाची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 01:12 PM2022-03-01T13:12:02+5:302022-03-01T13:13:06+5:30
Russia-Ukraine Conflict: आपल्या विद्यार्थ्यांसाठी पाकिस्तानने काहीही पुढाकार घेतला नसताना ते भारताचा तिरंगा ध्वज हाती घेऊन मदतीची अपेक्षा करत आहेत.
संदीप भालेराव, लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ‘मिशन गंगा’ मोहीम सुरू करण्यात आली असताना पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानने काहीही केलेले नसल्याने पाकिस्तानी विद्यार्थी भारतीय ध्वज हाती घेऊन भारताकडे मदतीच्या अपेक्षेने पाहत असल्याचे चित्र रुमानियाच्या बुखारेस्ट विमानतळावर दिसल्याचे मायदेशी परतलेल्या नाशिकच्या रिद्धी शर्मा या विद्यार्थिनीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाचे अधिकारीही मदत करीत असल्याचा अनुभव रिद्धीने सांगितला. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेली रिद्धी शर्मा ही विद्यार्थिनी युद्धभूमीतून सोमवारी नाशिकला परतली.
भारतीयांप्रमाणेच असंख्य पाकिस्तानी विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावासाकडून विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशाकडून मदत मिळत नसल्याने त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे मदतीचा हात मागितला आहे.
भारतीय विद्यार्थ्यांसाठी बुकारेस्ट विमानतळावर भारतीय दूतावासाचे काही अधिकारी असून पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी या अधिकाऱ्यांकडे मदत मागितली आहे. यासाठी त्यांनी भारतीय ध्वज फडकविला असल्याचेदेखील रिद्धीने सांगितले. युक्रेनच्या युद्धभूमीत वैरभाव विसरून भारतीय अधिकारीदेखील या विद्यार्थ्यांना दिलासा देत असून त्यांना होईल तितकी मदत करीत आहेत. विद्यार्थी रुमानियाच्या बुकारेस्ट विमानतळावरून आपापल्या देशांमध्ये परतत आहेत.