लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तो काळ अत्यंत वाईट होता. जितेंद्र आव्हाड यांना कोरोना झाला होता. त्यांच्यासाठी सगळेजण प्रार्थना करत होते. त्याकाळात चांगलं घडावं असे सकारात्मक विचार मनात सुरू होते. आपल्याला वाईट प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येईल का? असे प्रश्नही मनात येत होते. मी त्याचीही तयारी ठेवली होती. मात्र लोकांनी मनापासून केलेल्या प्रार्थनेत खूप बळ होते. त्यातून जितेंद्र आव्हाड सुखरूप परत आले. माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात कठीण काळ होता, असे सांगताना संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड यांना काहीसे गलबलून आले...! मात्र क्षणात स्वतःला त्यांनी सावरले.
जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत कार्यालयात विशेष अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अनेक प्रश्नांना अत्यंत मनापासून त्यांनी उत्तरे दिली. काही प्रश्नांच्या बाबतीत पोटतिडकीने स्वतःची भूमिका स्पष्ट केली. आपले पती मंत्री आहेत. महाविकास आघाडीचे महत्त्वाचे घटक आहेत, असे असतानाही त्यांनी काही विषयांवर अत्यंत परखड मते मांडली.
कोविड काळात जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती खालावली होती? अशा कठीण प्रसंगाचा सामना कसा केला? - ती परिस्थिती व तो काळ अत्यंत वाईट होता. कोविड काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की नशीबच सर्व ठरवत असते. श्रीमंत माणसाकडे पैसा असूनही त्याला प्राण गमवावे लागले. तर खिशात पैसे नसलेला गरीब माणूस बरा होऊन स्वतःच्या पायाने चालत घरी परतला. जितेंद्र आव्हाड यांना कोविडची लागण पहिल्यांदा झाल्यानंतर त्यांनी आजारपण अंगावर काढले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्या काळात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पद्मसिंह पाटील यांचा चौकशीसाठी नियमित फोन येत असे. कार्यकर्ते, नेते सर्वांनीच आव्हाड यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली. पण त्या काळात चांगलं घडावं असं सकारात्मक विचार मनात सुरू असताना वाईट प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारीदेखील मी ठेवली होती.
निर्भीड विचार, दृढ निश्चय, मनात समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड आणि पदराशी असलेला सामाजिक चळवळींचा अनुभव यातून आपले स्वतंत्र अस्तित्व जपणाऱ्या ऋता आव्हाड. कुटुंब, नवरा आणि मुलीची जबाबदारी, सामाजिक कार्याशी लहानपणापासून जोडलेली नाळ हे सारं सांभाळत ऋता आव्हाड यांनी २२ वर्षांहून अधिक काळ हवाई सुंदरी म्हणून नोकरी करून स्वाभिमान जपला आहे. आता त्या समाजकार्यात आपला विशेष ठसा उमटवत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना ‘लाेकमत’ने विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले हाेते. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना मनमाेकळी उत्तरे दिली. काही प्रश्नांवर परखडपणे आपली भूमिकाही स्पष्ट केली. आपला नवरा राजकारणात असल्याने त्या पदाला असलेले वलय आणि त्यातही जितेंद्र आव्हाडांना मतदारसंघात लागणारी मदत करीत ऋता यांनी आपली स्वतंत्र ओळख अबाधित ठेवली आहे याचे विशेष कौतुक. घरी चळवळीचे वातावरण असले तरी ऋता नेहमी समाजकारणातच रमल्या आणि यापुढेही त्याचसाठी धडपडणार असल्याचे त्या स्पष्ट करतात. जुन्या, बुरसटलेल्या संकल्पनांना बाजूला ठेवून मुलींचे शिक्षण आणि सबलीकरण, सक्षमीकरण कसे महत्त्वाचे आहे हे त्या आपल्या कार्यातून आणि स्पष्ट विचारांतून अधोरेखित करतात. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत स्वतःची ओळख निर्माण करायला हवी, अधिकार व हक्कांसाठी लढायला हवे हेच त्यांचे व्यक्तिमत्त्व सांगते. महिलांना समान संधी आणि वागणूक देण्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करायला हवी, या वाक्यावर त्या ठाम असून मगच आपण परिवर्तनाच्या बाता करायला हव्यात याची प्रचिती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून निश्चित येते.