प्रकाश बाळ जोशी -
मुंबई, दि. 23 - एका बिंदूत काय समावलेलं आहे – याचा आपल्या अमूर्त शैलीद्वारे जीवनभर शोध घेणारे एस इच रझा त्या बिंदूच्या अनंतात विलीन झाले. मध्य प्रदेशात जन्मलेल्या रझा यांच्यावर तिथल्या दृश्याचा आणि आपल्या बालपणातील अनेक अनुभवांचा प्रभाव त्यांच्या अंतापर्यंत कायम राहिला आणि तो त्यांच्या दीर्घकालीन चित्रकलेच्या प्रवासातून जाणवत राहिला.
शालेय शिक्षण संपवून ,नागपूर कला विद्यालय ते जे जे कालाविद्यालय असा प्रवास करून झाल्यावर ते बॉंम्बे प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या सान्निध्यात आले आणि त्यांना आपला सूर गवसला. भारत स्वतंत्र होत असतानाच कलेच्या क्षेत्रातही अनेक नवनवीन प्रयोग होत होते, आणि भारतीय चित्रकार केवळ पाश्चिमात्य मापदंडावर अवलंबून न राहता आपल्या भारतीय जीवन शैलीचा शोध घेत आपली स्वतःची अमुर्तशैली शोधत होते. त्या प्रवाहातील रझा हा एक मोठा कलाकार होता जो सातत्याने आपला स्वतःचा शोध घेत होता.
फार काळ मुंबईत न रमता ते १९५० साली पॅरिसला रवाना झाले, आणि तिथेच मोकळ्या वातावरणात रमले. पण आपल्या मातीला ते विसरले नाहीत. तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपले काम तपासतानाच ते सातत्याने भारतात यायला आणि इथल्या कलाक्षेत्राशी संपर्क ठेवण्यास मात्र विसरले नाहीत.
नवी दिल्ली येथे रझा आकादमी स्थापन करून नव्याने कलेच्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या नव्या दमाच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचेही काम करायला ते विसरले नाही. इंडिया आर्ट फेअर मध्य २०१२ मध्ये त्यांना भेटण्याची संधी मिळाली. वाढत्या वयाच्या समस्या बाजूला ठेऊन व्हील चेअरमध्ये बसून ते या वर्षी कोणते नवीन कलाकार आपले काम रसिकांपुढे ठेवत आहेत याची आपुलकीने चौकशी करीत होते. तसे फार न बोलणारे परंतु कला विषयावर भरभरून बोलणारे रझा मला एका गोष्टीसाठी कायम लक्षात राहतील – ती त्यांची निमुळती लांब बोटं. ती त्यांची बोटच खूप बोलतात अस वाटत राहीलं, ती बोटं बघूनच हा माणूस कलाकार आहे हा अंदाज बांधता आला असता.
तसं रझा यांनी भरपूर काम करून ठेवलं आहे , पण ते लक्षात राहतील ते त्यांच्या बिंदू मुळे. साधारणतः १९७० च्या आसपास ते बिंदूभोवती खेळायला लागले आणि बघता बघता तो त्यांचा ट्रेड मार्क बनून गेला. बिंदू हाच त्यांचा ब्रँड बनला आणि त्यानंतर कित्येक वर्षे ते बिंदूच्या प्रेमात पडलेले दिसतात. पण प्रत्येक बिंदू तो काढण्याची लकब, त्याच्या आजुबाजूच्या रेषा आणि रंग अजब. प्रत्येक कलाकृती ही काहितरी वेगळं सांगणारी, विचार करायला लावणारी.
त्यांच्या शाळेतले एक शिक्षक फळ्यावर लिहिताना वाक्य संपले कि पूर्णविराम देताना तो जास्त ठळक आणि मोठा द्यायचे. तो कायम लक्षात राहिला असावा. अभ्यासात त्याचं मन लागत नाही हे बघून त्या शिक्षकाने एक बिंदू काढला आणि तो बघत बस असे सांगून बाहेर निघून गेले. त्यावेळी त्याचा अर्थ कळला नसेल पण पुढे तोच बिंदू त्याच्या कलेत मानाच स्थान पटकवून बसला. काळा, निळा, लाल, पांढरा आणि पिवळा हे हमखास आढळणारे त्यांचे ठळक रंग.
तुम्हाला फक्त बिंदू काढण्याचा कंटाळा येत नाही का असं एकदा त्यांना विचारले असता ते म्हणाले , “ कलाकाराला एकच कल्पना त्याचे काम पुढे न्यायला पुरेशी असते”. त्यांच्या या बिंदुला अर्थ देण्यासाठी मग रेषा , त्रिकोण, वर्तुळ, अर्धवर्तुळ यांचा समावेश विविध रंगात झाला.
आपले पुर्ण आयुष्य कलेला अर्पण करणाऱ्या रझा यांना पद्मश्री, ललित कला अकादमीचे सन्माननीय सदस्य यासारख्या किताबांनी सन्मानित करण्यात आले. त्यांचा एक बिंदू आजही अनेक कलाकारांना एक आव्हान ठरत आहे.