मुंबई:कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. चंद्रकांत पाटलांनी तर 'निवडणुकीत पराभव झाल्यास हिमालयात जाईन', अशी घोषणा केली होती. त्यावरुन आता त्यांच्यावर टीका होत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून चंद्रकांत पाटलांना टोला लगावण्यात आला आहे.
'जातीय हिंसा घडवणाऱ्यांना चपराक''कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे. पश्चिम बंगालात भाजपने जिंकलेल्या आसनसोल मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. तेथे तृणमूल काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले. छत्तीसगढमध्ये काँग्रेस तर बिहारमधील विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रीय जनता दलाने जिंकली आहे. निवडणुका जिद्दीने, एकजुटीने लढवल्या की भाजपचा पराभव करता येतो हे सूत्र चार राज्यांतील पोटनिवडणुकांत दिसले. जातीय हिंसेवर चिंता व्यक्त करणारे संयुक्त निवेदन 13 पक्षांनी काढले. भाजपचा राजकीय पराभव हाच त्या विंचवावर उतारा आहे. कोल्हापूर व प. बंगालने ते दाखवून दिले.'
'निवडणूक लागताच पाटील गायब झाले''कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नी महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. 97,332 मते मिळवून त्या विजयी झाल्या. या मतदारसंघात भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली 78,025 मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता. ''कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन व जिंकून येईन'' असे आव्हान पाटलांनी दिले होते, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले.'
'पाटलांना हिमालयात जाण्याची संधी कोल्हापूरकरांनी दिली''चंद्रकांतदादा पाटील यांनी 'या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ', अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील,' असा टोला पाटलांना लगावण्यात आला आहे.