आदर्की (जि. सातारा) : पुणे-मिरज लोहमार्गावर आदर्की व वाठार रेल्वे स्थानकांदरम्यान बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मिरजकडून साखर घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या मालगाडीचे १६ डबे घसरले. त्यामुळे पुणे-मिरज मार्गावरील सर्व गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या. अपघातामुळे महालक्ष्मी आणि सह्याद्री एक्स्प्रेस दौंडमार्गे रवाना झाल्या. तर कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस गाड्या रद्द झाल्या.अपघातानंतर सात डबे रुळापासून चाळीस फूट भरावावरून खाली कोसळले, तर उर्वरित डबे दगडी भिंतीला धडकले. सुमारे तीनशे मीटर रेल्वे रुळाच्या सिमेंट स्लीपरचे तुकडे झाले. पुण्यापासून ११० किलोमीटर तर आदर्की गावापासून दोन किलोमीटर अंतरावर अपघात झाला. सकाळी सात वाजता वाठार स्टेशन रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गाडीचे बाकीचे डबे दोन्ही बाजूंनी सोडवून वेगळे काढण्यात आले. दुपारी बारा वाजता दौंडहून मदत पथक मोठ्या क्रेनसह दाखल झाले आणि अपघातग्रस्त डबे हटविण्याच्या कामाला वेग आला. मालगाडी अपघातामुळे गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यात थांबविण्यात आली होती. (वार्ताहर)
साता-यात मालगाडीचे डबे घसरले
By admin | Published: April 23, 2015 3:02 AM