सिद्धार्थ आराख/बुलडाणा: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनिस यांचे फार काही चुकले नाही, मला गोध्राकांडचे मोदी आवडत नाहीत., असं ते बोलले होते. हे वक्तव्य यापूर्वी अनेकांनी केलेले आहे.; मात्र सबनिसांच्या या वक्तव्यावरून उठलेल्या वादंगावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी, त्याचवेळी दिलगिरी व्यक्त केली असती तर एवढा स्तोम माजला नसता, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले. डॉ. पानतावणे हे बुलडाणा येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता, ते लोकमतशी बोलत होते. अ.भा.मराठी साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडेल याबद्दल शंका नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.आंबेडकरी चळवळीचे भवितव्य काय ?आंबेडकरी चळवळीत व्यक्तिस्तोम वाढल्यामुळे चळवळ पतनाकडे चालली आहे., याला कोणी एक व्यक्ती नव्हे तर, सर्वच जबाबदार आहेत. प्रचंड अज्ञान असतानाही बाबासाहेबांचे नाव घेतले की, लोक टाळ्या देतात व आपलं नेतृत्व मान्य करतात, हा गैरसमज निर्माण झाल्याने चळवळ दिशाहीन होत चालली आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. दुर्दैवाने तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत, त्यामुळे आंबेडकरी चळवळ दिशाहीन होत चालली आहे.रिपाइंच्या विविध गटांचे नेते एकत्र का येत नाहीत ?सर्वच नेत्यांमध्ये अहंकार भरलेला आहे.; पण आता ऐक्य झालं पाहिजे, ते अपरिहार्य आहे. ऐक्यासाठी वामनदादासहीत आम्ही सर्व साहित्यिकांनी यापूर्वी प्रयत्न केले होते. बैठक बोलाविली, सर्वच नेते हजर होते. त्यावेळी मी असे म्हटले होते की, नेत्यांना राजकीय प्रशिक्षणाची गरज आहे. त्यांनी बाबासाहेबांनी तयार केलेला शेड्युल कास्ट फेडरेशनचा निवडणूक जाहीरनामा वाचावा. यावर रा.सु.गवई यांना प्रचंड राग आला होता. तुम्ही आम्हाला आता प्रशिक्षण देणार काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता. ऐक्याच्या बाबतीत वेळोवेळी हेच झालं. मी काय चुकीचं बोललो होतो. माझा तर दावा आहे की, प्रकाश आंबेडकरांसहीत एकाही नेत्यांनी बाबासाहेब पूर्णपणे वाचलेच नाहीत.केवळ जुजबी माहितीवर हे भाषण ठोकतात., नेत्यांनी आता बाबासाहेबांची राजकीय नीती समजून घेतली पाहिजे.रामदास आठवले नेहमीच वादग्रस्त वक्तव्य का करतात ?रामदास आठवले एक सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता आहे.; पण भाजपमध्ये त्यांची फरफट सुरू आहे. मी आधीच त्यांना सांगितलं होतं की, हे भाजपवाले धोका देतील, मंत्रीपद वैगरे काही देणार नाही.; पण त्यांनी ऐकलं नाही. आता अस्तित्व टिकवण्यासाठी हे सारं बोलावं लागत आहे. बाबासाहेबांनीसुद्धा त्या-त्या परिस्थितीनुसार इतर पक्षांशी राजकीय तडजोड, नव्हे करार केले होते. त्यांनी आजच्या नेत्यांसारखी घटक पक्षांना बुद्धी सर्मपित केली नव्हती, एवढे भान नेत्यांनी ठेवलं पाहिजे,तरच राजकीय जीवनात नेते यशस्वी होतील.रिपब्लिकन नेत्यांसाठी आपली काय सूचना असेल ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील राजकीय पक्ष निर्माण करायचा असेल तर, बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट फेडरेशन या राजकीय पक्षाचा तयार केलेला जाहीरनामा आजच्या नेत्यांनी वाचावा आणि या जाहीरनाम्यातील काही अंशाचा जरी आपल्या राजकीय जीवनात वापर केला, तरी आंबेडकरी समाजाचे भले होईल. अस्मितादर्श साहित्य संमेलनाबद्दल काय सांगाल?१९७४ साली पहिले अस्मितादर्श साहित्य संमेलन भरले. तेव्हापासून आजतागायत ४८ वर्षात अस्मितादर्श या नियतकालिकाने व साहित्य संमेलनाने कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंतांच्या तीन पिढय़ा घडविल्या. अनेकांना लिहितं केलं. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरचे लेखक, कवी लिहू लागले. त्यांच्या भाषेत साहित्य तयार झाले. यावर्षीचे २१ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन वाशिम येथे होणार असून, प्रा. रवींद्र हडसन हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
सबनिसांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त करायला हवी होती
By admin | Published: January 15, 2016 1:51 AM