पिंपरी : देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. दिवसभरातील घटनाक्रम लक्षात घेता, सबनीस यांचा निषेध आणि ‘..तर मोदी एका दिवसात संपला असता; आणि पाडगावकरांआधी त्यांची शोकसभा घ्यावी लागली असती,’ या त्यांच्या वक्तव्याचे समर्थन असा वाद साहित्य संमेलनाच्या मंडपात शिरण्याची चिन्हे आहेत.आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात गुरुवारी झालेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनात ‘समन्वय आणि संवाद’ या विषयावर बोलताना ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य केले. ‘डॉ. सबनीस यांनी माफी मागितली नाही, तर संमेलनात त्यांना पाय ठेवू देणार नाही,’ असा इशारा खासदार अमर साबळे यांनी शुक्रवारी पिंपरीत दिला. काय बोलले सबनीस...संघर्षाच्या जागा आहेत, तिथे असूद्यात. आपण आता संवादाकडे वळूयात. पाकिस्तानातील गुलाम अलींना भारतात येऊद्यात, येथे गाऊद्यात. पंतप्रधान काबूलवरून अचानक पाकमध्ये जातात. त्यांना नवाझ शरीफ यांचा पुळका आलेला नव्हता, तर राष्ट्रासाठी ते गेले. मोदींची गोध्रा हत्याकांड काळातील कारकिर्द कलंकित आहे. मोदी हे शरीफ यांना शुभेच्छा देण्यासाठी शीर तळहातावर घेऊन पाकमध्ये गेले होते. ही मरायची लक्षणे होती. तेथे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. बॉम्बगोळा येऊन पडू शकत होता. तसे झाले असते, तर मोदी एका दिवसात संपला असता आणि पाडगावकरांआधी त्यांची शोकसभा घ्यावी लागली असती, असे वक्तव्य त्यांनी केले होते.पंतप्रधानांच्या काळजीपोटी बोललो - सबनीस नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी, गौतम बुद्ध यांचा अहिंसेचा विचार जागतिकस्तरावर पोहोचवला. त्यांची राष्ट्रभक्ती माझ्या आत्मीयतेचा विषय आहे. त्यांच्या जिवाच्या काळजीपोटी मी सविस्तर भाषण केले. मात्र, विपर्यास करून काही मंडळी माझे अभिव्यक्तीस्वातंत्र्य दाबू पाहत आहेत. या भूमिकेचे परिणाम संमेलनावर होणार नसून, ते भाजपालाच भोगावे लागतील, असे सबनीस म्हणाले.
सबनीस बोलले, राजकारण तापले !
By admin | Published: January 02, 2016 8:37 AM