मुंबई : महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाकरिता विश्वविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांना ब्रँड अॅम्बॅसिडर होण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. याकरिता कुणालाही मानधन देणार नसल्याचे स्पष्ट केले.महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पासंबंधी माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. ठाणे खाडीमध्ये फ्लेमिंगो अभयारण्यासाठी १६ चौरस कि.मी. जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्याचा विस्तार करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
राज्यातील व्याघ्र प्रकल्पाकरिता सचिन आणि ‘बिग बी’ ब्रॅण्ड अॅम्बॅसिडर
By admin | Published: August 04, 2015 1:05 AM