मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून राज्यातील राजकारण तापलेले दिसत आहे. यातच मराठी कलाविश्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) राज ठाकरे यांच्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन देणे प्राजक्ता माळीला भोवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच याप्रकरणी प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून तिची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्राजक्ता माळीने मनसेच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यावेळी प्राजक्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर प्राजक्ताने स्पष्टीकरणही दिले होते. प्राजक्ताने नुकतीच इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, काही काळातच तिने ही पोस्ट एडिट केली. यानंतर आता राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून काढण्यात यावे
सचिन खरात यांनी व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत म्हटले आहे की, राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर भाषणाचे समर्थन केल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची पोस्ट तपासून राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातूनदेखील त्यांना काढण्यात यावे, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
काय म्हणाली होती प्राजक्ता माळी?
प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने प्रचंड सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. सोबतच दुसऱ्या फोटोमध्ये तिने वर्तमानपत्रात असलेल्या एका लेखाचा फोटो शेअर केला आहे. या लेखात मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिल्याचे दिसून येत आहे. प्राजक्ताने म्हटले होते की, “असो…आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक धन्यवाद… राज ठाकरे सगळ्याचसाठी… परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटत..? खूप धन्यवाद”.
दरम्यान, प्राजक्ताने काही काळातच ही पोस्ट एडिट केली. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या आणि ईदच्या शुभेच्छा देत १ मे रोजी राज ठाकरेंनी दिलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली होती. तर, या पोस्टमधील राज ठाकरे यांच्या भाषणावरील तिची प्रतिक्रिया तिने डिलीट केली असून, या पोस्टमध्ये आता केवळ अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा वर ईदच्या शुभेच्छाच दिसून येत आहेत.