Coronavirus : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:45 PM2021-03-30T15:45:20+5:302021-03-30T15:47:36+5:30
सचिन सावंत यांनी ट्विट करत दिली माहिती
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच सरकारकडून खबरदारीचे उपायही सूचवण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचं पालन न झाल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, अनेक सेलिब्रिटी, खेळाडू आणि नेते या कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रकाँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.
"माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क परिधान करा. आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलं आहे. यापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, त्यांची आई रश्मी ठाकरे, तसंच मनसेचे आमदार राजू पाटील हेदेखील करोनाच्या विळख्यात सापडले होते.
माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 30, 2021
मुंबईत संख्या वाढतीच
मुंबईत सोमवारी कोरोनाचे ५ हजार ८८८ रुग्ण आढळले असून, १२ रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारच्या आकडेवारीनंतर कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार ५६२ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ६६१ झाला आहे. त्यानंर उपनगरात ४७ हजार ४५३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती.