मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते आणि ठाकरे सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षातील नेते एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात 'ट्वीटर वॉर' रंगला असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेनेनी विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानी लढवली होती. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने महायुतीच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे काही प्रश्न विचारयाचे असतील तर ते अजित पवारांना विचारा, असा ट्वीट सोमय्या यांनी सावंत यांना टॅग केला होता.
सोमय्या यांनी केलेल्या ट्वीटला उत्तर देताना सावंत म्हणाले की, "सोमय्या जी तुम्ही जे लिहलं आहे, त्याच्या अर्थ काय ? हे तुम्हालाच माहित. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 'मामु' बनवले हे मात्र निश्चित. तर 'मामु' म्हणजे माजी मुख्यमंत्री, तुमच्या मनातील दुसरा अर्थ माझ्या मनात नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सावंत यांनी असे ट्वीट करताच आता त्यांना सोमय्या यांनी सुद्धा प्रतिउत्तर दिले आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी कुणाला 'मामु' बनवलं हे त्यांना माहित. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसनेने महाराष्ट्राच्या जनतेला 'मामु' बनवलं असल्याचं, सोमय्या म्हणाले आहे. त्यामुळे सोमय्या आणि सावंत यांच्यात 'ट्वीटर वॉर' रंगला असल्याचे पाहायला मिळत आहे.