मुंबई – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी(Mukesh Ambani Bomb Scare) आढळली होती, या प्रकरणी NIA तपास करत आहेत, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे, त्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या संपूर्ण प्रकरणावर निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी भाष्य केले आहे. राजकारण्याचं आयुष्य फक्त ५ वर्ष असतं मग त्यांचं कशाला काहीही ऐकायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.(Retired IPS Officer Suresh Khopade on Sachin Vaze Case)
याबाबत लोकमतनं सुरेश खोपडे यांच्याशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, लोकशाही प्रक्रियेत पोलिसांना काम करताना राज्यकर्त्यांचे ऐकावं लागतं, राजकीय हस्तक्षेप असतो हे खरं आहे, कारण लोकप्रतिनिधींना लोकांना उत्तर द्यावं लागतं, पण सचिन वाझेंना त्यांच्या चुकीबद्दल अटक झाली, परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली झाली, लोकं म्हणतात राजकारण्यांनी यांचा बळी दिलाय, पण मी ३५ वर्ष पोलीस सेवेत काम केले आहे, राजकारण्याचं बळी व्हायचं की नाही हे पोलीस अधिकाऱ्याने ठरवायचं असतं, राजकारण्यांनी काहीही सांगितलं तरी प्रतिक्रिया काय द्यायची हे आयपीएस अधिकाऱ्यांच्या हातात असतं, म्हणून आयपीएस अधिकारी आणि वरिष्ठ पोलिसांवर दोष येऊन पोहचतो, मीदेखील आयपीएस अधिकारी म्हणून निवृत्त झालो, आमचं एकूण आयुष्य ६० वर्ष असतं, उघडपणे भानगडी न करता फक्त पाट्या टाकल्या तरी ६० वर्ष आम्हाला कोणीही हलवू शकत नाही, पण राजकारण्यांना ५ वर्ष आयुष्य असतं, मग हे लोक आपल्याला बदली व्यतिरिक्त काही करू शकत नाही असं माहिती असेल तर आयपीएस अधिकाऱ्याला मानानं काम करता येतं आणि योग्य व्यक्तिला न्याय देता येतो असं त्यांनी सांगितले.
“भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्षनेते पद धोक्यात असल्यानं दिल्लीवारी”
त्याचसोबत मी सातारला एसपी असताना एका गंभीर आरोपाखाली छत्रपती उदयनराजे(Chhatrapati Udayanraje Bhosale) यांना मंत्री असताना अटक करून गुन्हा दाखल केला होता, तेव्हा गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) गृहमंत्री होते, त्यांनी थेट मला उदयनराजेंना का अटक केली असा प्रश्न केला होता, तुम्ही आमच्या विरोधी आहात, बघून घेऊ असं ते म्हणाले होते, त्यानंतर माझी २ महिन्याने बदली करण्यात आली, पण काही फरक पडला नाही. मी माझं काम केले होते, अधिकारी बदलला म्हणजे तो दोषी होता हे सिद्ध होतं नसतं, बदली झाल्यानंतर तपास सुरु असतो, तपास सहसा बंद करता येत नाही, कायदेशीर प्रक्रिया पाहिली तर तपास कोर्टातच थांबवता येतो, बदली झाली तरी तपास प्रक्रिया थांबणार नाही असं सांगत सुरेश खोपडे यांनी परमबीर सिंग यांची बदली झाली तरी त्यांचा तपास होऊ शकतो असं म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत मी ८ वर्ष नोकरी केली आहे, पोलीस दलाचा अभ्यास करून मी ७ पुस्तके लिहिली आहेत, पोलीस दलाची कार्यपद्धती पूर्णपणे कालबाह्य झाली आहे, हे बदलण्याचं काम आयपीएस अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे, राजकारण्यांना पोलीस दलातील सुक्ष्म गोष्टी कळत नाही, पण आरामात आयुष्य जावं, मुंबईत बदली व्हावी, चांगली पोस्टींग मिळावी हा विचार आयपीएस अधिकारी करतात, जर या गोष्टी सोडल्या तर पोलीस दलात खूप सकारात्मक बदल होती, पोलीस दलासोबतच राजकीय सिस्टिमही बदलण्याचा विचार व्हायला हवा असंही मत निवृत्त सनदी अधिकारी सुरेश खोपडे यांनी व्यक्त केलं आहे.
पाहा संपूर्ण मुलाखत