मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक करण्यात आली. या प्रकणी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, सचिन वाझे प्रकरणाचा तपास आता कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी म्हटले आहे. (anil deshmukh says now sachin vaze case investigation could be done without any obstruction)
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. त्यांच्या बदलीची चर्चा देखील सुरू होती. अखेर राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. राष्ट्रीय तपास यंत्रणेने सचिन वाझे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शोधाशोध केली. रात्रीपर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत पथकाच्या हाती काय लागले याबाबत एनआयएने माहिती दिली नाही, असे सांगितले जात आहे.
विना अडथळा तपास पूर्ण होईल
एनआयए आणि एटीएस सचिन वाझे प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करीत आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोणत्याही अडथळ्याशिवाय या प्रकरणाचा तपास होईल, असे अनिल देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
गृहमंत्री महोदय... तुम्ही नेमकं केलं काय? भाजपचा अनिल देशमुखांवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान, मुंबई पोलीस दलाची प्रतिष्ठा खूप मोठी आहे. त्यांची तुलना स्कॉटलँड यार्डशी होते. पण काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृत्यांचा फटका संपूर्ण पोलीस दलाला बसतो, अशा शब्दांत देशमुख यांनी अँटिलिया प्रकरणावर भाष्य केले होते. इतक्या गंभीर आणि महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास एपीआय पदावरील वाझेंकडे का सोपवला, या प्रश्नाला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले. सुरुवातीला सीआययूकडे तपास दिला गेला. वाझे या विभागाचे प्रमुख होते. पण तीन दिवसांतच या घटनेचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवला गेला, असे देशमुख म्हणाले होते.