मुंबई, दि. 2- राज्यात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. दीड, पाच आणि सात दिवसासाठी आलेल्या बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर सध्या दहा दिवसाचे गणपती पाहायला जाण्याकडे लोकांचा जास्त कल दिसून येतो आहे. सर्वसामान्य लोक ज्याप्रमाणे आवडीने मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या बाप्पाचं दर्शन घेतात त्याच प्रमाणे सेलिब्रेटीही आवर्जुन मुंबईतील बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावताना दिसत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसुद्धा आवडीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडपात हजेरी लावताना दिसतो आहे. नुकतंच सचिनने संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. शनिवारी सचिनने मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणेश मंडळाला भेट दिली. वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळात जाऊन सचिनने बाप्पाचं दर्शन घेतलं.
क्रिकेटचा देव बाप्पाच्या दर्शनासाठी आल्यावर तिथे चाहत्यांची गर्दी जमणं स्वाभाविकचं आहे. सचिनसोबत फोटो काढायला मिळणं किंवा त्याची ऑटोग्राफ मिळण्याची त्याच्या प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अगदी सगळेच सचिनचे चाहते आहे. वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाच्या भेटी दरम्याने एका चिमुकल्या चाहत्याला सचिनची ऑटोग्राफ मिळाली. विशेष म्हणजे या मुलाचा डावा हात फ्रॅक्चर झाला होता. अशातच त्याने फ्रॅक्चर असलेल्या हातावर असणाऱ्या प्लॅस्टरवर सचिनची ऑटोग्राफ घेतली. गणेश मंडळाच्या भेटी दरम्यानचे फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केले आहेत. त्याच फोटोमध्ये हा चिमुकला हातावरील प्लॅस्टरवर सचिनची ऑटोग्राफ घेताना दिसतो आहे. पण हा मुलगा कोण आहे? याबद्दलची माहिती मिळालेली नाही.
वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळाला भेट दिल्यानंतर सचिनने मंडळाचं आणि आशिष शेलार यांचं ट्विटमधून कौतुकही केलं आहे. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरने सहकुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. यावेळी सचिनला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली होती. यावेळी गणेश मंडळाच्यावतीने त्याचा मानचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. त्यामुळेच या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी असते.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमिताभ बच्चन लालबागच्या राजाच्या आरतीला उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत अभिषेक बच्चनदेखील उपस्थित होता. अमिताभ बच्चन दरवर्षी लालबागच्या दर्शनाला येतात. त्याचप्रमाणे यंदाही महानायक अमिताभ बच्चन यांनी लालबाबच्या राजाचे दर्शन घेत बाप्पाचा आशीर्वाद घेतला. अमिताभ यांच्या हस्ते बाप्पाची आरतीदेखील करण्यात आली.