मुंबई - एलफिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबईतील लोकल प्रवाशांच्या समस्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रोजच पादचारी पुलांवरून गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांच्या मदतीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे सरसावला आहे. सचिनने मुंबईतील पादचारी पुलांच्या दुरुस्तीसाठी आपल्या खासदार निधीतून दोन कोटी रुपये निधी दिला आहे. मुंबईकर असलेल्या सचिनने यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले असून, त्यात या निधीबाबत तपशील दिला आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना निधीची तरतूद करण्यास सांगण्यात आले आहे. यामधील एक कोटी रुपये पश्चिम रेल्वेवरील पादचारी पुलांसाठी तर एक कोटी रुपये मध्य रेल्वेवरील पादचारी पुलांसाठी देण्यात यावेत असे सचिनने आपल्या पत्रात सांगितले आहे.
कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने 29 सप्टेंबर रोजी खरी ठरली. एलफिन्स्टन रोड स्थानकावर 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी होऊन 8 महिला आणि एका लहान मुलासह तब्बल 22 जणांचा यात बळी गेला, तर 39 प्रवासी जखमी झाले. तर शनिवारी उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. मुंबईतील रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची ही पहिलीच घटना ठरली होती.