- अभय लांजेवार, उमरेडमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शनिवारी पहाटेच्या सुमारास उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात भ्रमंती केली. वन विभागानेही सचिनचा दौरा अतिशय गुप्त ठेवला. पत्नी अंजली, मुलगा अर्जुन यांच्यासह सचिन शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाला. उमरेडनजीकच्या एका हॉटेलात त्यांचा रात्री मुक्काम होता. पहाटेच्या सुमारास तेंडुलकर कुटुंबीयांनी वनविभागाच्या विश्रामगृहालगत असणाऱ्या प्रवेशद्वारातून अभयारण्यात प्रवेश केला. सचिनने अभयारण्यात भ्रमंतीचा एकदा नव्हे, तर दोनदा आनंद लुटला.मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये पोलीस बंदोबस्त होता. पहाटेपासून दुपारी १२ वाजतापर्यंत सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांनी जंगल भ्रमंती केली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच्या सुमारास सचिन पुन्हा अभयारण्यात गेला. शनिवारी रात्री त्याचा येथेच मुक्काम असल्याची माहिती आहे. जंगलभ्रमंतीसाठी आलेल्या पर्यटकांना सचिन दिसताच ‘वाघ दिसला नाही तरी चालेल,’ अशा प्रतिक्रिया दिल्या. काळे- पांढरे पट्टे असलेला टी शर्ट, निळ्या रंगाची जिन्स आणि डोक्यावर हॅट घातलेला सचिन बघताच सर्वांच्या नजरा त्याच्यावरच खिळून होत्या. काही गाईड आणि जिप्सी चालकांनी त्याच्यासोबत छायाचित्र काढून घेतले. उद्धव ठाकरेंनी घेतले व्याघ्रदर्शन...शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहपरिवार ताडोबा भ्रमंतीसाठी आले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारा गेटमधून त्यांनी ताडोबात प्रवेश केला. भ्रमंतीदरम्यान येनबोडी येथे त्यांना वाघाचे दर्शन झाल्याची माहिती एका गाईडने ‘लोकमत’ला दिली. ते ताडोबातीलच घोसरी येथे मुक्कामी असल्याचीही माहिती आहे.
कुटुंबीयांसह सचिनची जंगलसफारी
By admin | Published: February 21, 2016 1:17 AM