मुंबई : अमरावती विभागातील सूक्ष्म सिंचनाच्या प्रलंबित अनुदानावरून आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृषीचे अपर मुख्य सचिव विजय कुमार यांना मंत्रालयातील दालनात घेराव घातला. कृषी अधिकाऱ्यांच्या बदमाशीमुळे शेतकरी अनुदानापासून वंचित असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.अमरावती विभागातील शेतकऱ्यांचे सुमारे अडीचशे कोटी रुपये ठिबक अनुदान प्रलंबित आहे. राज्य सरकारने संमत करूनही स्थानिक अधिकारी शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करीत नाहीत. शेतकऱ्यांनी ठिबक संचासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. त्यांच्याकडून बँकांची व्याजवसुलीही सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, वित्तमंत्री, कृषिमंत्री या भागातील असूनही कृषी अधिकारी शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहेत, अशी टीका कडू यांनी या वेळी केली. कडू यांनी कार्यकर्त्यांसह मंत्रालयातील कृषी सचिवांच्या दालनात ठिय्या मांडला होता. अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्याही निदर्शनास त्यांनी या गोष्टी आणून दिल्या. ठोस निर्णय घेतला जात नाही, तोवर दालन न सोडण्याचा पवित्रा त्यांनी घेतला. या वेळी कार्यकर्ते जोरजोरात घोषणाबाजी करीत होते. त्यामुळे पाचव्या मजल्यावरील दालनाबाहेर काही काळ गोंधळाची स्थिती होती. (विशेष प्रतिनिधी)शेतकऱ्यांना न्याय देणार - कृषिमंत्रीआमदार बच्चू कडू यांनी ज्यासंदर्भात आंदोलन केले आहे त्यापैकी काही शेतकऱ्यांनी ठिबक संच बसविताना कृषी विभागाची परवानगी घेतलेली नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी नियमानुसार परवानगी घेत ठिबक संच बसविले त्यांना लवकरच अनुदानाची रक्कम दिली जाईल. यासंदर्भात विदर्भ विकास सिंचन योजनेत मंजूर केलेले अनुदान मिळावे यासाठी दिल्लीला जाणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
बच्चू कडू यांचा कृषी सचिवांना घेराव
By admin | Published: January 04, 2017 1:25 AM