ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १४ - ‘राममंदिर हा भाजपसाठी राजकारणाचा मुद्दा नाही’ हा विचार आता चमकला असेल तर राममंदिराचे तेव्हाचे आंदोलन व त्यातील बलिदाने काय चोर-लफंग्यांची होती? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून विचारला आहे. ज्या अयोध्या आंदोलनाचे नेतृत्व भाजपने केले, अयोध्या यात्रेवर स्वार होऊन देशातला माहोल गरमागरम झाला. रामभक्तांच्या, करसेवकांच्या रक्ताने शरयू लाल झाली ते सर्व काय होते? भाजपने आता त्या सर्व करसेवकांची व अयोध्येतील बलिदाने झालेल्या रामभक्तांची माफी मागायला हवी असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.
आश्वासने द्यायची व कृती करायची नाही असा निर्धार आमच्या सत्तेतील मित्रवर्यांनी केलेला दिसतोय. ज्या मुद्यांसाठी रान पेटवायचे तेच मुद्दे सत्तेवर येताच अडगळीत टाकून शांत बसायचे असेच एकंदरीत धोरण दिसते. सत्तेवर येताच प्रखर राष्ट्रवादाचे किंवा हिंदुत्वाचे हे सर्व मुद्दे वादग्रस्त मानून बाजूला ठेवायचे. हेच आता राममंदिराच्या बाबतीत घडत असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. अयोध्येत कालपर्यंत श्रीरामाची आरती, भजन म्हणणारे अचानक रामाच्या गर्भगृहात जणू नमाज पढू लागले किंवा भानगडी नकोत म्हणून कालच्या रामभक्तांनी प्रभू श्रीरामाचे धर्मांतर करून स्वत:च्या मागचा ससेमिरा सोडवून टाकला. भाजपने राममंदिराचे राजकारण कधीच केले नाही ही थाप आहे की विनोद याचा खुलासा आता व्हायलाच हवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
कश्मीरात ३७० कलमाची नाडी मेहबुबा मुफ्तीने सोडलीच आहे. समान नागरी कायद्याचेही बारा वाजवले आहेतच. आता रामाचे धर्मांतर करून नमाज पढण्याचेच काम सुरू झाले आहे. राममंदिर हा राजकीय मुद्दा नसल्याचे सांगून शरयूत समाधी घेतलेल्या रामभक्तांचीही जणू सुन्ता करून टाकली! हे धक्कादायक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे.
बहुमत असते तर राममंदिराआधी ‘जीएसटी’ मंजूर केले असते, असेही भाजप नेत्यांनी जाहीर केले. राममंदिरासाठी भाजपला ३८० खासदारांचे बळ हवे, अशी भूमिका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीच मध्यंतरी मांडली होती. आज भाजपला लोकसभेत संपूर्ण बहुमत आहे व प्रभू श्रीरामाच्या अयोध्या भूमीतून ७५ खासदारांचे बळ मिळाले. भाजप फक्त दोन खासदारांतून आताच्या राजकीय शिखरावर पोहोचला तो फक्त राममंदिराच्या प्रश्नावर. अयोध्येत राममंदिर उभे करू हे वचन भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात अनेकदा दिले. ते नक्की काय होते? राजकारणात व निवडणूक प्रचारात दिल्या-घेतल्या आश्वासनांकडे गांभीर्याने पाहायचे नसते हे मान्य केले तरी या रांगेत प्रभू श्रीरामास उभे करणे म्हणजे हिंदुत्वाचा पराभव आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्येत निर्माण करणे हे राष्ट्रीय कार्य आहे व त्यासाठी पाकिस्तान किंवा ओबामांची परवानगी घेण्याची गरज नाही अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
राममंदिर हा फक्त आस्थेचा विषय असेल तर मग राममंदिराच्या नावे आतापर्यंत सांडलेल्या रक्ताशी आपले अजिबात नाते नसून हिंदुत्व आणि राममंदिराच्या बाबतीत आमच्या धमन्यांतून आता दुसरेच रक्त उसळत आहे, याची कबुली द्यावी लागेल. उत्तर प्रदेशच्या निवडणुका येनकेनप्रकारे जिंकायच्याच आहेत हे खरे, पण त्यासाठी प्रभू श्रीरामाची कबर खणायचे प्रयोजन काय? अयोध्येत बाबरी नामक पडक्या वास्तूचे घुमट कोसळताच ‘‘आम्ही नाही त्यातले, हे आमचे कामच नाही. बाबरी पाडण्याचे काम बहुधा शिवसैनिकांनी केले असेल,’’ अशी पळपुटी भूमिका तेव्हा भाजपने घेताच शिवसेनाप्रमुख हिंदुत्वाच्या अभिमानाने कडाडले होते, ‘‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे!’’ आम्ही आजही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हंटलं आहे.