शिवाजी गोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नकळत झालेल्या चुकीमुळे मला आशियाई स्तरावरील स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक गमवावे लागले, याचे नक्कीच दु:ख आहे. पण पुढील राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत हार न मानता याचा वचपा मी नक्कीच घेणार असल्याचे पदक गमवावे लागलेल्या पुण्याच्या (मूळची दानापूर, तालुका तेल्हार, जि. अकोला) अर्चना आढावने ‘लोकमत’ला सांगितले. भुवनेश्वर येथे संपलेल्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अर्चनाने सुवर्णपदक जिंकले होते. पण हा आनंद तिला काही काळच साजरा करता आला. तांत्रिक समितीने श्रीलंकेच्या धावपटूला शेवटच्या २५ मीटरमध्ये असताना हाताचा धक्का लावून अडथळा आणल्याबद्दल तिला दोषी ठरवून पदक काढून घेतले. रविवारी स्पर्धा संपल्यानंतर अर्चना आपले मार्गदर्शक डॉ. निकोलाय यांच्यासह प्रशिक्षण शिबिरासाठी धर्मशाला येथे सोमवारी पोहोचली, तेव्हा तिच्याबरोबर संपर्क साधला असता तिने वरील वक्तव्य केले. ती म्हणाली, ‘‘संपूर्ण अॅथलेटिक्स जगताचे लक्ष आमच्या शर्यतीकडे होते, कारण या शर्यतीत पी. टी. उषाची खास धावपटू टिंटू लुका पळणार होती. त्यामुळे शर्यतीच्या सुरुवातीपासून मी मनाचा निश्चय केला होता, की आपण या शर्यतीत चांगली कामगिरी करून पदक जिंकायचे एवढेच होते. शर्यत सुरू झाली तेव्हा आम्ही पहिले १०० मीटर संपल्यावर काही अंतर बरोबरीनेच पळत होते. या वेळी टिंटू पहिल्या क्रमांकावर होती. टिंटूने ही आघाडी पहिल्या चारशे मीटरपर्यंत राखली होती. पण नंतर ती मागे पडली. पहिले पाचशे मीटर झाले तेव्हा मी तिसऱ्या क्रमांकावर होते. त्या वेळी श्रीलंकेची धावपटू पहिली होती. पहिल्या चारशे मीटर आम्ही एक मिनिटात पूर्ण केले होते. शर्यत खूप फास्ट होत होती. शेवटचे शंभर मीटर राहिले असताना श्रीलंकेच्या दोघी आणि मी बरोबरीनेच पळत होतो. शेवटचे २५ मीटर राहिले असताना श्रीलंकेच्या धावपटूचा पायाचा थोडा धक्का माझ्या पायाला लागला. तेव्हा माझा तोल जाईल की काय, असे मला वाटत होते. पण मी स्वत:ला सांभाळण्याच्या बडबडीत माझ्या हाताचा धक्का श्रीलंकेच्या धावपटूला लागला. तेवढा मला एवढे काही वाटले नाही, की यावरून पदक जाईल म्हणून. माझ्याकडून ही चूक काही मुद्दाम केली गेलेली नाही. एवढ्या मोठ्या स्पर्धेत धावायचे म्हणजे तेसुद्धा लेनमध्ये नाही, तेव्हा असे काही होतेच.’’ पण, हासुद्धा मला एक धडा आहे. आपण जेव्हा पळतो तेव्हा अशा चुकासुद्धा चुकून आपल्याकडून होऊ शकतात, हे माझ्या चांगलेच लक्षात ठेवावे लागणार आहे. पण याचा वचपा मी नक्कीच पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये घेणार, असे विश्वासाने अर्चनाने म्हणाली. टिंटूलाने शर्यत मध्येच सोडून दिली, म्हणजेच तिला असे वाटले असावे, की या धावपटूंच्याबरोबर आपली डाळ शिजणार नाही, त्यामुळे तिने मध्ये शर्यत सोडून दिली. माझे मार्गदर्शक डॉ. निकोलाय यांना अजिबात दु:ख झाले नाही. उलट ते म्हणाले, की माझ्या दृष्टीने तूच सुवर्णपदकविजेती आहेस. शर्यतीत तांत्रिक कारणावरून तुझे पदक काढून घेतले गेले आहे. पण तू पहिलीच आहेस ना. तू दिलेली वेळसुद्धा चांगलीच आहे. आपण राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत याचा वचपा काढू. त्यामुळे आम्ही लगेच धर्मशाला येथे प्रशिक्षण शिबिरासाठी आलो आहोत. पदक गेल्याचे दु:ख मनात ठेवू नकोस. आत्मविश्वासाने पराभवाला सामोरे जाण्याची तयारी ठेव. - अर्चना आढाव
पदक गेल्याचे दु:ख, पण हार मानणार नाही : अर्चना आढाव
By admin | Published: July 11, 2017 2:20 AM