लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर/उस्मानाबाद : शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने तुळजापूर दौऱ्यावर गेलेल्या माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री केतकी चितळे हिची पाठराखण केली. केतकी कणखर आहे. तिला कुणाच्या समर्थनाची गरज नाही. तिला मानावे लागेल, अशा शब्दांत तिचे समर्थन केले. वकील न घेता न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. राष्ट्रवादीचे लोक जाहीर भाषणात ब्राह्मण समाजाचा अपमान करतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन लिहितात, बोलतात. तेव्हा कुठे जाते तुमची नैतिकता, आताच कशी ती उफाळून येते, असा सवाल खोत यांनी उपस्थित केला.
सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या समर्थनानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून गेले. सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी दुपारी तीन वाजता हा प्रकार घडला.
मी समर्थन केलेच नाही
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अचानक अंगावर आल्याने सदाभाऊ आणि सोबतचे कार्यकर्ते भेदरून गेले. मी केतकीच्या पोस्टचे समर्थन केले नाही. केतकी न्यायालयात खंबीरपणे उभी राहिली याबद्दल मी बोललो, असे सदाभाऊ सांगू लागले. सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी प्रसंगावधान राखून कार्यकर्त्यांची समजूत काढली.