Sadabhau Khot News: आगामी लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस राहिलेले आहेत. १५ मार्चपर्यंत निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातच जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू असल्याचे दिसत आहे. राज्यातही राजकारण तापताना पाहायला मिळत असून, भावी खासदार म्हणून ठिकठिकाणी नेतेमंडळींचे बॅनर लागत आहेत. सदाभाऊ खोत यांचाही भावी खासदार म्हणून बॅनर झळकला होता. याबाबत सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांचा भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनर लावले होते. प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सदाभाऊ खोत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मंत्रीपदाच्या काळात जो काही विकासाचा डोंगर उभा केला. आरोग्याच्या सुविधांपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत, शेताच्या रस्त्यापर्यंत मोठी कामे आम्ही या मतदारसंघात जनतेसाठी करू शकलो. जनतेची इच्छा आहे की, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी. म्हणून निश्चितपणे, लढेंगे और जितेंगे भी, असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महायुतीची दिल्लीमधील बैठक सकारात्मक झाली. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील, अशी परिस्थिती नाही. ८० टक्के काम पूर्ण झाले असून, २० टक्के काम राहिले आहे. लवकरच हे काम पूर्ण करू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.