Sadabhau Khot : "शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने घशात घातले अन् महिन्याभराच्या सरकारला जाब विचारताय?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 02:29 PM2022-07-31T14:29:40+5:302022-07-31T14:40:33+5:30
Sadabhau Khot Slams NCP Ajit Pawar : शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. घरांसह गोठ्याची पडझड झाली असून जनावरांचीही हानी झाली आहे. शेतीकामेही ठप्प पडली असून, रोजगार हिरावल्याने अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसांमागून दिवस लोटत असूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. तसेच शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. यावरून आता सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
"शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँका तुम्ही लोकांनी घशात घातल्या" असं म्हणत अजित पवारांवर (NCP Ajit Pawar) हल्लाबोल केला आहे. माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कुणाला जाब विचारत आहात? ५० वर्षाची राजकीय कारकीर्द, ४ वेळा मुख्यमंत्री, २ वेळा कृषीमंत्री आपले साहेब तरी महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या का करतो?" असा सवाल खोत यांनी केला आहे.
शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 31, 2022
~ अजित पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
कुणाला जाब विचारत आहात?
५० वर्षाची राजकीय कारकीर्द
४ वेळा मुख्यमंत्री
२ वेळा कृषीमंत्री आपले साहेब तरी महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या का करतो ?
"शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने, दूध संघ, जिल्हा बँका तुम्ही लोकांनी घशात घातल्या आणि महिन्याभराच्या सरकारला तुम्ही जाब विचारताय?" असं देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी विदर्भ दौरा सुरू केल्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी टीका केली. या टिकेला उत्तर देताना मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत? इथे फिल्डवर उतरूनच बघावं लागतं असा टोला लगावला.
विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या अशा शब्दात अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.