राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांवेळी भरपावसात भिजून साताऱ्यातील सभेला संबोधित केले होते. पवार यांचा हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शरद पवारांच्या या पावसातील सभेची आणि पावसातील फोटोची गावागावात आणि वाड्या वस्त्यांवरही जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार (NCP Rohit Pawar) यांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोत ते हातात छत्री असताना पावसात भिजताना दिसून येतात. यावरूनच सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे.
"आजोबा भिजले नातूही भिजले पण काय उपयोग?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच या नाटकावर पडदा टाका रोहित दादा, प्रेक्षक हुशार आहेत असंही म्हटलं. माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आजोबा भिजले नातूही भिजले पण काय उपयोग? यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यातील अडचणींचा, प्रश्नांचा पूर नाही दिसला. या नाटकावर पडदा टाका रोहित दादा, प्रेक्षक हुशार आहेत" असं खोत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रोहित पवारांचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर पावसात भिजत त्यांनी फोटोसाठी पोज दिली त्यावेळी, त्यांच्या हातात छत्री दिसून येत असल्याने या फोटोवरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. तसेच हातात छत्री असतानाही पावसात भिजण्याचं कारण काय? असा सवाल त्यांना विचारला जात आहे. रोहित पवार यांनी साताऱ्यातील कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यावेळी, दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथे फोटोही काढले. या दरम्यान, रिमझिम पाऊस सुरू होता.
आपल्या ट्विटरर अकाऊंटवरुन रोहित पवार यांनी प्रीतिसंगम येथील समाधीस्थळाचे दर्शन घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांच्यासमेवत त्यांचे वडिलही दिसून येतात. वडिलांनी डोक्यावर छत्री घेतल्याचेही फोटोत दिसतं. "देशाच्या राजकारणातील सुसंस्कृत नेते आणि हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या कराड येथील प्रीतिसंगम या समाधीस्थळी बाबांसह भेट देऊन अभिवादन केलं. नेहमीप्रमाणे आजची भेटही प्रेरणादायी होती" असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होत.