सोलापूर: युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्यावरून आता भाजपसह अन्य पक्षांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. रामाकडे जावा नाही, तर काशीत अंघोळ करा, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही पूर्णपणे उतरले आहात, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.
सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे, पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. ते अयोध्येच्या स्वारीवर गेले आहेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला, ज्यांनी राम मंदिर बांधायची यांच्यात हिम्मत नाही असे म्हणाले तेच आता आयोध्येला निघाले आहेत, या शब्दांत सदाभाऊ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. या टीकेचाही सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला. मला या लोकांचे हसू येते, काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा बघू तुमची दानत आहे का? मला वाटते की, महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. सुप्रिया सुळेंनी तो शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही? प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगे काय? असा खोचक टोला सदाभाऊ यांनी लगावला.
दरम्यान, चांगले काम करण्यासाठी रामलल्लांचे आशीर्वाद असतील तर मुंबई महानगरपालिकेत रामराज्य आणू शकतो. शिवसेनेचे राजकारण आणि हिंदुत्व सर्वांना माहिती आहे. आमचे राजकारण सरळ आहे आणि आमचे हिंदुत्व स्पष्ट आहे. रघुकुल रीत सदा चली आएं प्राण जाए पर वचन ना जाए हे आमचं हिंदुत्व आहे. आम्ही निवडणुकीत जी वचने देतो ती पूर्ण करतो. मग निवडणूक असो वा नसो, जिंकलो, हरलो तरी आम्ही दिलेले वचन पूर्ण करतो, असे आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावेळी सांगितले.