परभणी: चिलटासारखं आंदोलन काय करता, दम असेल तर मैदानात या, असं खुलं आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना दिलं आहे. आज परभणीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून आंदोलन केलं. टोमॅटोला कमी भाव मिळत असल्यानं स्वाभिमानीच्या शेतकऱ्यांनी खोत यांचा निषेध नोंदवला होता. यावरुन खोत यांनी थेट राजू शेट्टी यांनाच आव्हान दिलं आहे. राजू शेट्टींनी ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीवर 15 वर्षे टीका केली, त्यांच्याच गळ्यात गळ्यात घालून सध्या ते फिरताहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. 'राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात आंदोलनं केली. त्यावेळी झालेल्या पोलीस कारवायांमध्ये शेतकरी जखमी झाले. मावळमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला होता. मात्र ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात शेतकऱ्यांनी संघर्ष केला, त्याच पक्षांच्या नेत्यांच्या गळ्यात गळे घालण्याचं काम राजू शेट्टी करत आहेत. शेतकऱ्यांच्या रक्तानं माखलेल्या नेत्यांसोबत आघाडी करण्याची तयारी शेट्टींनी सुरू केली आहे,' असं टीकास्त्र खोत यांनी सोडलं. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचीही खिल्ली उडवली. चिलटासमोर आंदोलन काय करता. दम असेल तर मैदानात या, असं खुलं आव्हान त्यांनी शेट्टींना दिलं. वेळ, काळ, स्थळ ठरवा. मैदानात दोन हात करा, असं खोत म्हणाले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी सदाभाऊ खोत आज परभणीत आले होते. विद्यापीठातील समारंभ आटोपल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर टोमॅटो फेकून आपला निषेध नोंदवला. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं.
दम असेल तर मैदानात या; सदाभाऊ खोतांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 7:53 PM