मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक भाषण केली, कोरोनाशी लढा पण शेतात लढणाऱ्या शेतकऱ्यांची मदत का करत नाही? हे सरकार कोरोनाचा बागुलबुवा दाखवत आहे, कोणताही प्रश्न आला तरी कोरोनाचं नाव पुढे केले जाते, सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलय, तर सामान्य माणूस आत्महत्येच्या दरडीवर उभा आहे अशा शब्दात माजी कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर घणाघात केला आहे.
पत्रकारांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, राज्यात सहकाराच्या माध्यमातून २४ टक्के दूध संकलन केले जाते तर खासगीच्या माध्यमातून ७६ टक्के दूध संकलन होते, या सहा महिन्यात शेतकऱ्यांचा भाजीपाला सडला, आंब्याला फटका बसला, फळांची नासाडी झाली पण सरकारकडून कोणतीही बाजारपेठ उभी राहिली नाही, राज्यात २० टक्क्यापेक्षा जास्त पिककर्ज शेतकऱ्यांना मिळू शकलं नाही. शेतीला जोडधंदा म्हणून दूधाचा धंदा केला जातो, पण त्याकडेही सरकार दुर्लक्ष करत आहे. दूधाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांना समजत नाही किंवा समजूनही ते मुक्या-बहिऱ्यासारखं करत आहेत असा टोला खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.
तसेच दूधाच्या प्रश्नावर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. दूध भुकटी परदेशातून आयात केल्यानं उत्पादकांना फटका बसला असा आरोप महाविकास आघाडीचे नेते करतात, पण केंद्राने एक किलो भुकटी परदेशातून आयात केली नाही, दुध भुकटी परदेशातून आणण्यास केंद्राने परवानगी दिली नाही. दूध उत्पादकांचा आवाज सरकारपर्यंत पोहचला नाही का? या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, राज्यातील केवळ १० तालुक्यातून दूधाचं संकलन केले जाते, उर्वरित तालुक्यातून दूध संकलन केले जात नाही, यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, सुनील केदार यांच्या संघातून दूध खरेदी केली जाते असा आरोप खोत यांनी केला, त्याचसोबत १ ऑगस्टच्यापूर्वी दूध उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा गावांगावातील दूध डेअरीसमोर हातात बॅनर घेऊन मागण्यांचे बॅनर्स झळकावू, रस्त्यावर दुधाची वाहने आली तर ती परतवून लावू असा इशारा महायुतीच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे. सोबतच दुधाची नासाडी करु नये, आंदोलनातील दूध रस्त्यावर न फेकता गरिबांना वाटा अशा कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.