सोलापूर - निवडणूक म्हंटली तर प्रचार करणं, कार्यकर्त्यांना खुश ठेवणं हे नेत्याचं काम असतं. निवडणुकीत अमाप पैसा खर्च केला जातो. पण सोलापूरात एक अशी घटना घडली आहे ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. माजी मंत्री सदाभाऊ यांनी २०१४ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत इतरांप्रमाणे सदाभाऊंनीही कार्यकर्त्यांना खुश ठेवले. परंतु आता तेच अंगलट आले आहे.
पंचायत राज्य समिती दौऱ्यानिमित्त रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत सांगोला दौऱ्यावर आले होते. नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांचा गराडा होता. परंतु सदाभाऊ खोत कारमधून खाली उतरताच मांजरी येथील अशोक शिनगारे यांनी त्यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्यांना जाब विचारू लागले. सन २०१४ चे हॉटेल बिल आहे ते द्या आणि पुढे जावा असे म्हणून त्यांना खोत यांना रोखले. यावेळी सदाभाऊ खोत यांनी तुमचे कसले पैसे मला काही माहीत नाही असतील तर देऊन टाकू असे म्हणाले. त्यावेळी शिनगारेंनी तुम्ही मंत्री झाल्यावर सुद्धा मला "लगा मी आता मंत्री झालो तुझे कसले पैसे मला माहिती नाही" असे म्हणून अपमानित केले ते काही मला माहित नाही, माझे पैसे द्या असे म्हणून गोंधळ घालू लागला.
या गोंधळात सदाभाऊ तिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी निघून गेले यावेळी रयत क्रांतीचे दीपक भोसले, शंभू माने, भारत चव्हाण प्रा संजय देशमुख यांनी त्यास समजावण्याचा प्रयत्न केला असता तो तुम्ही मला कोणी समजवायचं नाही माझे पैसे मला मिळाले पाहिजेत. मी कार्यक्रम संपल्यानंतरही भाऊना पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.
काय आहे प्रकरण?२०१४ मध्ये माढा लोकसभा निवडणुकीत सदाभाऊ खोत रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत प्रचारावेळी सदाभाऊ खोत यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना जेवायला शिनगारे यांच्या हॉटेलला नेलं. त्याठिकाणी हॉटेलचं बिल ६६ हजार ४५० रुपये झाले. मात्र हे पैसे नंतर देतो सांगत ते निघून गेले. तेव्हापासून हॉटेल मालकाला हे पैसे मिळाले नाहीत असा त्यांचा आरोप आहे. त्याचसोबत सदाभाऊ मंत्री झाले तेव्हा पाठपुरावा केला, केवळ देऊ, बघू केलं त्यामुळे आज हॉटेलमालकाने सदाभाऊ खोत यांना घेरलं