बारामती : पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी चळवळ तळागळापर्यंत रुजविण्यात यशस्वी ठरलेले आणि एकेकाळी एकमेकांचे कट्टर मित्र असलेले दोन नेते राजकारणाच्या वाटचालीत मात्र आता पक्के वैरी झाले असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते आहे. या दोन नेत्यांनी आपापल्या आक्रमक आंदोलनामुळे बारामतीत येऊन पवारांना आव्हान दिले होते. यात एक नाव म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व दुसरं रयत शेतकरी क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत हे आहे. आज न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या या दोन नेत्यांनी बारामतीचे राजकारण ढवळून निघाले. पण याचवेळी सदाभाऊ खोतांनी दिलेली दिलजमाईची "ऑफर "राजू शेट्टी यांनी मी असंगाशी संग करत नाही म्हणत थेट धुडकावून लावली.
बारामतीत 2012 साली ऊसदर आंदोलनामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यातील खटल्याची आज अंतिम सुनावणी होती. यामुळे माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री सदाभाऊ खोत हे फोन नेते बारामतीत आले होते. यावेळी दोघांनी आपले वेगवेगळे 'टायमिंग' साधत पत्रकारांशी संवाद साधला. तसेच दुपारच्या सत्रात हे दोन नेते समोरासमोर आले. त्यावेळी एकमेकांना ते कसे सामोरे जातात याबद्दल उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.मात्र दोघांनी पण एकमेकांना टाळले अन् सर्वांचाच हिरमोड झाला.
सदाभाऊ खोतांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खोतांनी कृषी कायद्यांचे समर्थन करताना काँग्रेस राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली तर शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर खरमरीत शब्दात भाष्य केले. खोत यांनी मंगळवारी सकाळीच न्यायालयात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना कोरोनानंतर राजू शेट्टी आणि मी एकत्र बसू असे वक्तव्य करत एकप्रकारे शेट्टी यांना दिलजमाईची ऑफरच देऊ केली होती. यानंतर हे दोन नेते पुन्हा एकत्र येतात की काय अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात झडू लागली होती.
मात्र, दुपारी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पण सर्वांना उत्सुकता होती ती शेट्टी हे खोत यांनी दिलेली ऑफर स्वीकारणार का नाही याची.पण त्यांनी खोत यांची ऑफर धुडकावून लावताना, बसण्याचे विविध प्रकार असतात, पण मी असंगाशी संग करत नाही अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेने भविष्यात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोन मातब्बर नेते एकत्र येण्याची आशा मावळली.