ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाउ खोत यांना आज सकाळी तातडीने ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आज पहाटे उलट्यांचा त्रास झाला आणि चक्करही आली होती, याशिवाय त्यांना मानदुखीचाही त्रास उद्भवला आहे.
सदाभाऊ खोत यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. पणन मंडळातील आढावा बैठक व अन्य कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्यासाठी ते काल रात्री पुण्यात आले. मात्र पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास झाला आणि चक्कर आली त्यानंतर त्यांना तातडीने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांचे आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे पणन मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
यापुर्वी, खोत यांची प्रकृती शनिवारी (दि.15) रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान अचानक बिघडल्यामुळे त्यांना चिखली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर रात्री उपचार केल्यानंतर सकाळी ७ वाजता सुटी देण्यात आली. त्यावेळी सदाभाऊ खोत वऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यानुसार शनिवारी बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे सभा घेतली. ही सभा पार पडल्यानंतर ते चिखली येथे मुक्कामासाठी येत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उलटीसोबत श्वास घेताना त्रास होऊ लागला.यावेळी त्यांच्यासोबत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर होते. त्यामुळे त्यांना चिखली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. योगीराज हॉस्पिटलचे डॉ. सुहास खेडेकर यांनी त्यांची तपासणी करून औषधोपचार केला.दरम्यान, त्यांना सकाळी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी नियोजित दौऱ्यानुसार सावळा, हातणी आदी ठिकाणी सभा तसेच बैठका घेतल्या.