मुंबई : दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. सदानंद कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास ४ तासांपासून चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचे व संशयास्पद खरेदी-विक्रीचे प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विद्यमान आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचेही नाव आले होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.
दरम्यान, आज दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून सदानंद कदम यांची चौकशी करण्यात आली. दापोलीतल्या कुठेशी गावात ईडीचे पथक आज सर्च ऑपरेशन साठी गेले होते. त्यानंतर सदानंद कदम यांना चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे. सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे राजकारणात फार सक्रीय नाहीत, पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे ते व्यावसायिक भागीदार असल्याचे म्हटले जाते.
अनिल परब यांच्या अडचणीत वाढ...साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच सदानंद कदम यांना ईडीने आज सकाळी त्यांना ताब्यात घेतले होते. सदानंद कदम हे रामदास कदम यांचे भाऊ असले तरी ते अनिल परब यांचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या अटकेमुळं अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, खेडच्या सभेसाठी सदानंद कदम यांनी पडद्याआडून जोरदार ताकद लावल्याची चर्चा होती. सभेनंतर चारच दिवसांनी इडीची कारवाई झाल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.