जेजुरी : सोमवती यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र जेजुरीत तीन लाखांहून अधिक भाविकांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात कुलदैवताचे दर्शन घेतले. वर्षातून दोन वेळा सोमवती यात्रांना विशेष महत्त्व असते. सोमवारी सोमवती यात्रेनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांनी जेजुरीत मोठी गर्दी केली होती. सोमवती अमावास्येला रविवारी (दि. १७) सकाळी ११.५९ वा. प्रारंभ झाला होता. ती आज सकाळी ९.४३ पर्यंतच असल्याने सूर्याला अमावास्या असतानाच देवाच्या उत्सवमूर्तींना कऱ्हास्नान घालणे आवश्यक असते. या मुळेच आज सोमवारी पहाटे ४ वाजता जेजुरी गडावरून उत्सवमूर्तींची पालखी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहाटे २ वाजता मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त संदीप घोणे, सुधीर गोडसे यांनी खंडोबा मंदिर उघडले. पहाटेचा अंधार असूनही या वेळी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविकांनी जेजुरीत व गडावर गर्दी केली होती. पहाटे ४ वाजता उत्सवमूर्तीच्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. गडकोटातील प्रमुख मंदिराच्या प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्रीखंडोबा व म्हाळसादेवीची उत्सवमूर्ती पालखीत ठेवण्यात आली. निशाण, अश्व, चामरे, अबदाणी, सनई चौघडा तसेच सोलो वादनाच्या मंगलसुरात सोहळा सुरू झाला. पहाटेचा सोहळा असल्याने सोहळ्याला मर्दानी स्वरूप आले होते. अत्यंत उत्साहात पालखीचे खांदेकरी, मानकरी पालखीला खांद्यावर घेऊन गडकोटातून बाहेर पडत होते. या वेळी उपस्थित भाविकांकडून देवाचा जयघोष सुरू होता, तर भंडार खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण होत होती. विद्युत प्रकाशझोतातील सोहळ्यावर भंडाऱ्याची होणारी उधळण सोन्याच्या जेजुरीचा अनुभव देत होती. गडकोटातून बाहेर पडलेला हा सोहळा मुख्य पायरीमार्गावरून नंदी चौकात आला. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील छत्री मंदिराचा मान स्वीकारून सोहळ्याने पहाटे ६ वाजता कऱ्हेकडे कूच केले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांकडून या सोहळ्यावर देवाचा जयघोष आणि भंडार खोबऱ्याची उधळण होत होती. पहाटेचा सोहळा असूनही राज्यभरातील भाविकांचा महापूर जाणवत होता. शहरातील मुख्य चौकातून निघालेल्या सोहळ्याने जेजुरी ते कऱ्हा नदी हे पाच किलोमीटरचे अंतर दोन तासांत पार करीत सकाळी आठ वाजता कऱ्हाकाठी पोहोचला. या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दही, दूध, कऱ्हेचे पाणी आदींसह देवाला स्नान घालण्यात आले. उत्सवमूर्तींची विधिवत पूजा व समाज आरती करण्यात आली. देवाच्या स्नानाबरोबरच उपस्थित हजारो भाविकांनी ही कऱ्हास्नान उरकले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. सोहळ्याने धालेवाडी, कोरपडमळामार्गे ठिकठिकाणच्या पालखी मार्गावरील मानकऱ्यांचा मान स्वीकारीत ग्रामदेवता जानाई देवीच्या प्रांगणात येऊन विसावला. संपूर्ण दिवसभर उत्सव मूर्तींची पालखी या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. सायंकाळी मंदिरातून सोहळ्याने गडाकडे कूच केले. रविवारी व सोमवारी अमावास्येचा पर्वकाल असल्याने सलग दोन दिवस जेजुरीत भाविकांची प्रचंड गर्दी होती. जेजुरी गडाच्या बरोबरच जयाद्रीच्या डोंगर रांगांतील कडेपठार मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी होती. पुणे, मोरगाव, नीरा आदी मार्गांवर जेजुरीत वाहनांची सुमारे दोन-दोन किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या. यात्रेच्या बंदोबस्तासाठी सुमारे ११० पोलीस कर्मचारी आणि १० पोलीस अधिकारी तैनात केले होते. जेजुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नियोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)हळद पावडरीची १०० पोती जप्त ४तीर्थक्षेत्र जेजुरीत यात्राकाळात बनावट भंडारा विकला जातो. याचा त्रास भाविकांना होत असल्याच्या तक्रारी नेहमीच येत असतात. या मुळे या यात्रेत अशा भंडाऱ्याची विक्री करणारांवर कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला होता. तरीही शहरातील एका व्यापाऱ्याने सुमारे १०० पोती भंडारा विक्रीसाठी आणला होता. ४यातील सुमारे चाळीस पोती पिवळी पावडर, ६० पोती हळद पावडर असल्याचे निदर्शनास आल्याने जेजुरी पोलिसांनी अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून कारवाई केली आहे. भेसळ प्रतिबंधक विभागाने याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, संपूर्ण पोती जप्त केल्याची माहिती या विभागाच्या प्रदीपा पावडे यांनी दिली आहे. साखळीचोरी व पाकिटमारीचे प्रमाण मोठे ४सोमवती यात्रेचा सोहळा उत्तररात्रीच्या वेळी असल्याने त्यातच प्रचंड गर्दी असल्याने खिसेकापूंनी चांगलाच हात मारला. यात सुमन सुनील भिलारे (रा. चेंबूर मुंबई) यांचे एक तोळ्याचे मंगळसूत्र, संजय निकुडे (रा. जेजुरी) यांची ४ तोळ्याची चेन, प्रवीण सखाराम साळे (रा. आडले ता. मावळ) यांची तीन तोळ्याची चेन, छबू रामनाथ बोडखे (रा. सिन्नर) यांचे कपडे व रोख ८ हजार चोरट्यांनी लंपास केले. ४जेजुरी पोलीस ठाण्यात भाविकांनी चोरीच्या रीतसर तक्रारी दिल्या आहेत. मात्र असे साखळी चोरी, मोबाईल चोरी, खिसेमारीचे असंख्य प्रकार घडले असल्याचे दिसून येत आहे.