जेजुरी ,दि. ३ (बी. एम. काळे ) अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट , येळकोट ,येळकोट ,,जयमल्हार ,,,असा जयघोष करीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली. देवदर्शन, कऱ्हा स्नानाची पर्वणी तळीभंडार ,जागरण गोंधळ आदी कुलधर्म कुलाचार पूजन उरकून अमावास्येचा वारी पूर्ण केली.सोमवारी अमावस्या असेल त्या दिवसाला सोमवती यात्रा भरते, यादिवशी अमावस्या पर्वकाळात खंडेरायाच्या उत्सवमूर्ती पालखी सोहळ्याद्वारे गडकोटातून क-हा नदीतीरावर नेल्या जातात. राज्याच्या विविध प्रांतातून आलेले भाविक आणि समस्त जेजुरीकर खादेकरी ,मानकरी ,पुजारी ,सेवेकरी यांच्या वतीने उत्सवमूर्तींना विधिवत अभिषेक स्नान घालण्यात येते. यंदा सोमवारी (दि. ३ ) दुपारी १२ वाजेपर्यंतच अमावास्येचा पुण्यकाळ असल्याने सकाळी ८ वाजता मुख्य वतनदार इनामदार पेशवे यांनी आदेश देताच भाविकांनी केलेल्या भंडाऱ्याच्या उधळणीत गडकोट आवारातून पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवले. देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली .यावेळी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे ,विश्वस्त राजकुमार लोढा ,संदीप जगताप ,पंकज निकुडे पाटील ,अड. अशोकराव संकपाळ ,तुषार सहाणे ,व्यवस्थापक राजेंद्र जगताप ,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गंणेश आगलावे ,नित्य वारकरी ,कृष्णा कुदळे , सोमनाथ उबाळे ,शहरातील अठरा पगड जातीधर्मातील मानकरी खांदेकरी ,पुजारी ,सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .पालखी सोहळ्यापुढे घडशी समाजबांधवांचा सनईचा मंगलमय सूर ,,छत्र चामरे ,अब्दागिरी ,मानाचा अश्व ... आदींच्या साथीने पालखी सोहळा मल्हार गौतमीश्वर मंदिरात पोहोचला. मुख्य शहरातील जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजबांधव पानसरे यांच्या पानांचे विड्याचा मान स्विकारुन धालेवाडीमार्गे क-हानदीतीराकडे मार्गस्थ झाला. दुपारचे साडेअकराच्या सुमारास रंभाई शिंपिन कट्टा -पापनाश तीर्थावर खंडोबा -म्हाळसादेवी उत्सव मूर्तींना विधीवत दही -दूध घालत स्नान घालण्यात आले ,यंदा भीषण दुष्काळामुळे क-हा नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडल्याने देवसंस्थानचे वतीने श्रीच्या व भाविकांच्या स्नानासाठी दोन टँकर ठेवण्यात आले होते . स्नान धार्मिक विधी उरकल्यानंतर पालखी सोहळा धालेवाडी गावात दुपारी ४वाजेपर्यंत स्थिरावला .त्यानंतर फुलाई माळीण कट्टा ,जानाईदेवी कट्टा ,येथे मान पान देत घेत सायंकाळी उशिरा पालखी सोहळा गडकोटात दाखल झाला .रोजमुरा वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली .सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने ,रामदास शेळके ,गणेश पिंगुवाले यांचे मार्गदर्शनाखाली सुमारे १५०पोलीस कर्मचारी वर्ग बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता .देवसंस्थानच्या वतीने भाविक, खांदेकरी मानकरी यांचेसाठी थंड पाणी बाटली ,अल्पोपहार उपलब्ध करून दिला रखरखत्या उन्हात पाय भाजू नयेत म्हणून पायमोजे वाटप करण्यात आले होते .यंदाच्या सोमवती उत्सवावर भीषण दुष्काळाचे सावट दिसून येत होते , राज्याच्या विविध प्रांतातून आलेला भाविक पाऊस पडू दे ,,दुष्काळ हटू दे ,,,,असे साकडे खंडेरायाला घालत होता .परिवहन मंडळाने जादा बस ठेवल्या होत्या .हार फुले ,भंडारा खोबरे , देवाची प्रतिके, टाक यांची मोठी उलाढाल झाली .
सदानंदाचा येळकोट... येळकोट...येळकोट जय मल्हार....!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 7:33 PM
सदानंदाचा येळकोट , येळकोट ,येळकोट ,,जयमल्हार ,,,असा जयघोष करीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ताने उधळण केली.
ठळक मुद्देसोमवती यात्रेनिमित्त दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन