नंदुरबार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात विरोधकांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, परंतु त्यांची ही सुडाची भाषा दुर्दैवी असून, पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली.ऊस व कापूस परिषद आणि युवती मेळाव्याच्या निमित्ताने खा. सुळे गुरुवारी नंदुरबारमध्ये आल्या होत्या. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘यापूर्वीही अनेक सरकारे आली व गेली. सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत राहिले, परंतु त्याला विशिष्ट मर्यादेची सीमा होती. आतासारखी सुडाची भावना कधीही, कुणाही ठेवली नाही. कुंडल्यांचा वापर शस्त्र म्हणून करणे कितपत योग्य आहे,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांची चिडचिड सध्या खूपच वाढली असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री कोणत्याही गोष्टीवर चिडतात. जर सरकार चालविणे जमत नसेल, तर पायउतार व्हा, आमच्याकडे त्यासाठी सक्षम लोक आहेत. शेतकरी आत्महत्या प्रकरणी आताचे सत्ताधारी तेव्हा सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत होते. आजही आत्महत्या होत आहेत, मग आता कोणावर गुन्हा दाखल करायचा,’ असा सवालही खा. सुळे यांनी केला. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची सुडाची भाषा दुर्दैवी
By admin | Published: October 07, 2016 5:56 AM