मुंबई : महाविकास आघाडीची सरकार स्थापन होताच मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ठाकरे सरकराने केलेल्या या कर्जमाफीच्या मुद्यावरून माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक असल्याची टीका केली आहे.
निवडणुकीत जर एखाद्या राजकीय पक्षानं शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले असेल तर ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. मात्र या सरकराने केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे. जाहीरनाम्यामध्ये तुम्ही उल्लेख करायला हवा होता की, तुमच्या पीककर्जालाच माफी देऊ, शेतीच्या जोडधंद्यासाठी घेतलेल्या कर्जाला आम्ही माफी देणार नाही, असे म्हणत खोत यांनी सरकारला धारेवर धरले.
त्यामुळे जे पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये छापतात आणि निवडून आल्यानंतर त्याची जर ते अंमलबजावणी करणार नसतील तर अशा पक्षांची नोंदणी रद्द केली गेली पाहिजे. निवडणूक आयोगाने याची दक्षता घ्यावी. आम्ही ही मागणी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचे सुद्धा यावेळी खोत म्हणाले.