मुंबई : रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. रयत क्रांती संघटनेच्या आपल्या सर्व जिल्हा आणि तालुका कार्यकारिणी समिती त्यांनी बरखास्त केली आहे. तर कार्यकर्त्यांच्या मागणीवरून एक नवा पक्ष काढण्याची घोषणा सदाभाऊ खोत यांनी औरंगाबादमध्ये केली.
येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे. तर मुंबईत एप्रिलमध्ये पहिले अधिवेशन घेतलं जाणार आहे. तसेच नव्या पक्षाचा झेंडा आणि नाव जनतेतून आलं पाहिजे, म्हणूनच लोकांना नाव आणि झेंडा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुचवावं, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलं.
तर यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्यावरून सरकारवर निशाणा सुद्धा साधला. फडणवीस सरकारच्या काळात शेतकरी वंचित राहिला. आताच असो किंवा आधीच सरकार, शेतकरी कर्जमाफी देताना निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे होती, असे खोत म्हणाले.