ऑनलाइन लोकमत
बीड, दि. २९ - शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करुन शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी खड्ड्यांमध्ये झोपून आंदोलन सुरु केले होते. आंदोलनापूर्वी परवानगी न घेतल्याने पोलिसांनी २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
शिवसंग्रामचे शहराध्यक्ष अशोक लोढा, अनिल घुमरे, राहुल मस्के, बालाजी पवार, शेख अजहर, मनोज जाधव, सतपाल लाहोट, शेख अमर, शिवाजी जाधव, सुशील जाधव, गणेश धोंडरे, मुजफ्फर चौधरी, खय्यूम इनामदार, मनोज चव्हाण, भीमा निंबाळकर, मंजित सातपुते, सचिन शहागडकर, जकी सौदागर, सुभाष सपकाळ, नितीन आगवान, अमोल पारवे, जुनेद खान या २२ जणांविरुद्ध शहर ठाण्यात मुंबई पोलीस अॅक्टअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पैकी २० आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. सकाळी १०:३० वाजेपासून शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी माळीवेस भागातून आंदोलनास सुरुवात केली. खड्ड्यांमध्ये झोपून निषेधाचे फलक झळकावत कार्यकर्त्यांनी पालिकेविरुद्ध घोषणाबाजी केली. निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्ते नगरपालिकेजवळ पोहोचताच शहर ठाण्याचे निरीक्षक एस. बी. पौळ, सहायक निरीक्षक सतीश जाधव हे फौजफाट्यासह तेथे पोहोचले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर ठाण्यात आणले. तेथे त्यांना अटक करण्यात आली. आंदोलन लोकशाही मार्गाने असते तर आमची हरकत नव्हती; परंतु आंदोलनापूर्वी त्यांनी कायदेशीर बाबी पूर्ण केल्या नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याचे निरीक्षक पौळ म्हणाले.