धुळे : शहरातील श्रद्धा सिंघवी या उच्चशिक्षित तरुणीचा जैन भागवती दीक्षा कार्यक्रम रविवारी सकाळी येथोल डोंगरे नगरात भक्ती व श्रद्धामय वातावरणात झाला. कार्यक्रमास देशभरातून जैन समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. विधीवत दीक्षा कार्यक्रमानंतर श्रद्धासिंघवी यांचे ‘साध्वी समितीजी’असे नामकरण करण्यात आले.तत्पूर्वी त्यांनी उपस्थित समाज बांधवांशी हितगुज साधून भावुक गीताद्वारे सर्व सुखांचा त्याग करतनिरोप घेतला.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. पुखराज बोरा, ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, औरंगाबादचे आमदार सुभाष झांबड, जळगाव येथील संघपती दलुभाऊ जैन, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे, धुळ्याचे आमदार अनिल गोटे या मान्यवरांसह देशभरातून मान्यवर समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते. अध्यात्मिक आशयाच्या सुंदर ‘बॅक ड्रॉप’च्या व्यासपीठावर प.पू.कुंदनऋषीजी म.सा. यांच्यासह मान्यवर मुनी, गुरुवर्या प्रतिभाकुंवर म.सा. व अन्य साध्वीगण विराजमान होते. धर्माचरणासाठी त्याग व संयमाचे महत्त्व सोदाहरण स्पष्ट करून श्रद्धा यांनी माता-पिता, बंधू व अन्य आप्तगणांकडे झालेल्या चुकांबद्दल क्षमायाचना केली. एखादी वीरमाता आपल्या वीर जवान पुत्रास हसून निरोप देते, तसेच संन्यस्त जीवन स्वीकारताना मला आईने त्या वीरमातेसारखा निरोप द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विविध मुनीवरांकडून मंत्रोच्चारांच्या उच्चारात दीक्षा विधी संपन्न झाला. साध्वींना आवश्यक असणारे साहित्य त्यांना प्रदान करण्यात आले. तसेच त्यांचे नामकरण ‘साध्वी समिती’ असे करण्यात आले. या वेळी त्यांच्या माता-पित्यांना कन्यावियोगाच्या भावनेने अश्रूअनावर झाले. संकेतस्थळाचा शुभारंभ दीक्षा कार्यक्रमाचे औचित्य साधून जैन सोशल युथ आॅर्गनायझेशनच्या संकेतस्थळाचा शुभारंभ ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी केला. तसेच दीक्षार्थी श्रद्धा सिंघवी यांची माहिती असलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्यासह औरंगाबादचे आमदार सुभाष झांबड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)
दीक्षार्थी श्रद्धा बनल्या साध्वी समिती!
By admin | Published: April 27, 2015 2:06 AM