फटका : एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संसदेचे 3 दिवसांचे कामकाज पाण्यात
पवन देशपांडे - मुंबई
एका आक्षेपार्ह शब्दाची किंमत किती असू शकते, याचा प्रत्यय कदाचित भाजपाला आला असेल. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्याचा फटका केवळ भाजपालाच बसलेला नाही तर देशाला तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शिवाय या गदारोळात अनेक महत्त्वाची विधेयकेही रखडली.
दिल्लीची सत्ता एकहाती मिळवण्याचे स्वप्न पाहणा:या भाजपाने आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. दिल्लीत अशाच एका प्रचारसभेत केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतला. असभ्य भाषा वापरणा:या मंत्र्याने राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी संसदेबाहेर आंदोलनही केले. सर्व विरोधक एकत्र आले. संसदेचे कामकाज तीन दिवस विस्कळीत झाल़े लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गदारोळ घातला.
अधिवेशन काळात संसदेचे एका मिनिटाचे काम चालवण्याचा खर्च सुमारे 2.5 लाख रुपये आहे. दर दिवशी सहा तास कामकाज होणो अपेक्षित असते. त्यानुसार संसदेच्या एका दिवसाच्या कामकाजाचा खर्च नऊ कोटी रुपये आहे. साध्वी ज्योती यांच्या वक्तव्यानंतर तीन दिवस कामकाज विस्कळीत आहे. यापुढेही कामकाज सुरळीत होण्याची शक्यता धूसर आहे. गेल्या तीन दिवसांत एकूण 27 कोटी रुपयांचा खर्च वाया गेला असून, विरोधाची धार कायम राहिल्यास दर दिवसाला 9 कोटी रुपयांचा भरुदड बसणार आहे.