मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वीच्या जामीन अर्जावरील निकाल २५ किंवा २६ एप्रिलला देऊ, असे गुरुवारी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालाकडे केवळ साध्वीचेच नाही, तर तपास यंत्रणेसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी मालेगाव २००६ बॉम्बस्फोटातील आरोपींच्या याचिकेवरील सुनावणी होती. मात्र खंडपीठाने आधी आपण मालेगाव २००८ प्रकरणातील आरोपींनी केलेल्या याचिकांवर निकाल देऊ, मगच या प्रकरणाकडे लक्ष देऊ, असे स्पष्ट केले.एप्रिल २०१६मध्ये एनआयएने साध्वीला क्लीन चिट देत आरोपींवरील ‘मकोका’ हटवला. त्यानंतर साध्वीने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र विशेष न्यायालयाने तिच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत, असे म्हणत तिचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीने उच्च न्यायालयात आव्हान दिले.साध्वीच्या जामीन अर्जावरील निकाल तयार आहे. २५ किंवा २६ एप्रिलला आम्ही निर्णय देऊ, असे खंडपीठाने म्हटले. न्यायालयाने २० फेबु्रवारी रोजी साध्वीच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. (प्रतिनिधी)
साध्वीच्या जामिनावरील निर्णय २५ एप्रिलला?
By admin | Published: April 21, 2017 3:11 AM