ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - महाराष्ट्रातील जनतेने यंदाही कोणालाच बहुमत दिले नाही, जनताजनार्दाला आम्ही दोष देणार नाही, मात्र विधानसभेच्या निकालामुळे जनता खूश आहे का ? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र पुन्हा अराजकता आणि अस्थिरतेच्या झोक्यावर गटांगळ्या खात आहे अशी भिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले आहे. युती तुटल्याचा सर्वाधिक फायदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला झाला असून 'युती' कायम असती तर आघाडीच्या २५ जागाही आल्या नसत्या असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एकीककडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व सत्ता विरोधात होती तर दुसरीकडे काँग्रेस - राष्ट्रवादीचे सत्ताधारी आमच्या विरोधात उतरली. सत्ता, मत्ता आणि 'थैैल्यां'चे पाठबळ दोन्ही बाजूला असताना शिवसेनेने एकाकी लढत दिली असेही ठाकरे यांनी नमूद केले.