लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्याच्या बहुतांश भागांत वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे वाहतुकीलाही त्याचा फटका बसला. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. कल्याण शहरासह उल्हासनगर परिसरात २० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. सर्वाधिक १३ मिमी पाऊस कल्याण शहरात पडला आहे. विजेच्या कडकडाटामुळे कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचा दावा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने केला. या पावसाने काही काळ वातावरणात गारवा पसरला. मात्र नंतर वातावरणातील उष्मा प्रचंड वाढला. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर परिसरालाही या पावसाचा फटका बसला. ठाण्यात शुक्रवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र या पावसात कोणतीही हानी झाली नाही. शनिवारी सकाळीदेखील पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. ठाणे शहराच्या लोकमान्यनगर, वर्तकनगर या भागात पाऊस झाला.
अवकाळी पावसाचा ठाणे जिल्ह्याला तडाखा
By admin | Published: May 14, 2017 5:15 AM